अकोला,दि.१२– जिल्ह्यात आज सायंकाळ पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आज दिवसभरात २४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आता १४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह अहवाल संख्या १३ वर कायम आहे. दरम्यान या १३ जणांपैकी एका रुग्णाने आत्महत्या केल्याने आता जिल्ह्यात १२ पॉझिटीव्ह रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल आहेत. आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) ३ जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. या सगळ्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत २११ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी १६१ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून १४८ निगेटिव्ह आहेत. तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी दिली.
आज प्राप्त झालेल्या २४ निगेटिव्ह अहवालांत पातूर येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या कुटूंबियांपैकी ३१ जणांचे नमुने पाठविले होते त्यातील १८ जणांचा समावेश आहे. हे सर्व १८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बाळापूर येथील पाच जण दाखल
दरम्यान शनिवारी (दि.११) आत्महत्या केलेल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील बाळापूर येथील पाच जणांचा आज तहसिलदार व अन्य पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. हे पाचही जण मयताच्या संपर्कात आल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल करण्यात आले असून त्यांचेही नमुने पाठविण्यात येत आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण सुरु
दरम्यान ज्या ज्या ठिकाणी पॉझिटीव्ह रुग्ण आढळले तो भाग केंद्रबिंदू मानून तीन किमी परिघातील कुटूंबांचे सर्वेक्षणही प्रगतीपथावर आहे. त्यात अकोला शहरातील बैदपुरा, अकोट फैल या भागांसह पातूर व बाळापूर येथे सर्वेक्षण सुरु आहे. दरम्यान अकोला शहरात महानगरपालिकेतर्फे तर पातूर व बाळापूर येथे जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत सर्वेक्षण होत आहे. अकोला शहरात ८८ चमू स्थापन करण्यात आले असून ९४५४ घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पातूर येथे ३८ चमू ३९०५ घरांचे सर्वेक्षण करणार आहेत तर बाळापूर येथे २४ चमू १२४१ घरांचे सर्वेक्षण करीत आहेत. हे सर्वेक्षण प्रगतीपथावर असून स्थानिक रहिवाशांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या चमूला योग्य माहिती देऊन सहकार्य करावे, त्यांना आरोग्य तपासणी करु द्यावी, हे आपल्या हिताचे आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.