अकोला,दि.१२: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर देशातील लॉक डाऊन व त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची हाताळणी करण्यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणेचे कामकाज सुटीचे सलग तीनही दिवस सुरु होते.शुक्रवार दि.१०, शनिवार दि.११ व रविवार दि.१२ असे तीन लागोपाठ सुट्यांचे दिवस असले तरी जिल्हा प्रशासनाचे कामकाज सुरु असल्याने अनेकांना प्रशासनाचे ‘वर्क ऑन हॉलिडे’ असा अनुभव आला.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर स्वतः कार्यालयात उपस्थित तसेच सर्व यंत्रणेवर नियंत्रण ठेवणे, परिस्थितीनिहाय आदेश जारी करणे याकामात व्यस्त होते. या कालावधीत नागरिकांना निर्माण होणारे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठीही प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती. निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले हे अन्नधान्य वितरणाचे नोडल अधिकारी आहेत रेशनचे धान्य वितरण व अन्य व्यवस्थांची कामे सुरळीत करण्यासाठी त्यांची व पुरवठा शाखेची यंत्रणा कार्यरत होती. या शिवाय विविध विभागांचा समन्वय करणारे रोहयो उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन अनिल खंडागळे, जिल्हा शासकीय रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तर अहोरात्र कार्यरत आहेत. संपूर्ण सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी असणारे पोलीस दलही ऑन ड्युटी २४ तास आहेत. या शिवाय ज्या ज्या भागात संसर्गित रुग्ण आढळले त्या भागात सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य विभागाच्या टिम हे सगळे जण सुटीच्या या कालावधीत अथक काम करीत आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्ष ही निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सुरु होता. तेथून वेळोवेळी विविध माहिती व आकडेवारी ही मंत्रालयस्तरावर पाठविली जाते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे हे स्वतः सर्व अहवाल पाठविणे त्यासाठी माहितीचे संकलन करणे ही कामे करत होते. प्रांताधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे हे ही कार्यरत होते. तसेच जिल्हाभरात घडणाऱ्या विविध घटनांवरही लक्ष ठेवून होते.