अकोला,दि.११ : जिल्ह्यात कोरोनाबाधीत १३ रुग्णांपैकी एकाने आज पहाटे आत्महत्या केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. हा मयत व्यक्ती हा आसाम येथील रहिवासी असल्याने त्याचे सर्व कुटुंबिय, नातेवाईक हे दूर आसाम मध्ये असतांना इथं अकोल्यात त्याच्या अंत्यसंस्काराची सर्व व्यवस्था करणाऱ्या प्रशासनाची सहृदयता दिसली. शेवटी ना सगे ना सोयरे इथं जागली माणुसकी याचाच प्रत्यय आला.
ज्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने आज आत्महत्या केली . तो आसाम राज्यातील रहिवासी होता. नागाव जिल्ह्यात सालपाडा हे त्याचं गाव. कोरोना संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार, त्याच्या शवाचे विच्छेदन करणे शक्य नव्हते. पण अंत्यसंस्कार तर करावे लागणारच होते. त्यासाठी त्याच्या कुटुंबियांना माहिती देऊन त्यांची संमती घेणेही आवश्यक होते. त्यासाठी आधी जिल्हा प्रशासनाने एक अहवाल तयार करुन मंत्रालयातील राज्य आपत्ती प्रभागाचे संचालक अभय यावलकर यांना पाठवला. त्यांच्या मार्फत तो आसाम शासनाला पाठवण्यात आला. त्यानंतर अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी नागाव जिल्हाधिकारी जादव सैकिया यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली व मयताच्या नातेवाईकांपर्यंत निरोप पोहोचविण्याची विनंती केली. त्याच प्रमाणे दोन्ही जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांनीही परस्परांशी वार्तालाप केला. त्यानुसार, नागाव जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली. नागाव जिल्हा प्रशानातील विकास आयुक्त भुपेश दास यांनी स्थानिक प्रशासनातली सुत्रे हलवून मयताच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. त्यांना हा निरोप देण्याची अवघड जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी पार पाडली. याकामी नागाव येथील रेड क्रॉसचे अध्यक्ष रॉकी हुल हुसेन यांचीही मदत झाली. जिल्हा प्रशासनाला आता पोलीस सोपस्कार पार पाडून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक ना हरकत दाखले जमवा जमव करायचे होते. ते काम प्रांताधिकारी निलेश अपार व तहसिलदार विजय लोखंडे हे अधिकारी पार पाडत होते. अकोला येथील मुस्लिम कब्रस्थान कमिटीच्या लोकांशी संपर्क करुन अंत्यसंस्काराची पूर्व तयारी करण्यात आली आहे. अकोल्याचे कब्रस्थान कमिटीचे पदाधिकाऱ्यांनीही आपल्या शिरावर ही जबाबदारी घेतली. रात्री उशीरापर्यंत काही ना हरकत प्रमाणपत्रे व मुख्य म्हणजे मयताच्या कुटुंबियांचे ना हरकत प्रमाणपत्र यायचे बाकी होते. ते पाठविण्यासाठी नागाव जिल्हा प्रशासन मदत करतंय. अद्याप हे अंत्यसंस्कार व्हायचेत, ते कदाचित उद्या सकाळपर्यंत होतील.
पण कोण कुठला व्यक्ती कुठं येतो, त्याच्या आयुष्याला अचानक वळण लागून एका अवचित क्षणी आयुष्याची अकल्पित सांगता होते. नेमके याच क्षणी त्याचे आप्तस्वकीय म्हणावे असे कोणीच नाही. आणि जे लोक त्याच्या अखेरच्या प्रवासासाठी झटतायेत ते त्याचे कुणीच नाहीत…. इथं जागली फक्त माणुसकी.
बाळापूर येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल ज्या कोरोना बाधीत रुग्णाने आत्महत्या केली . तो बाळापुर येथे वास्तव्यास असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे बाळापूर येथे उपविभागीय अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनासह प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दि