मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन १४ एप्रिलपासून पुढे किमान ३० एप्रिलपर्यंत पुढे कायम राहणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज शनिवारी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले.
राज्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. सुरुवात पुण्यापासून झाली. मुंबईचे विमानतळ जगाचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे सहाजिकच मुंबईत प्रादुर्भाव वाढला. रुग्ण संख्या वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. मुंबईत रुग्ण सापडलेली ठिकाणे सील केली आहेत. मात्र, लोकांची सोय करत आहोत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात ३३ हजार चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या आहेत. त्यात मुंबईत १ हजार पॉझिटिव्ह सापडले आहेत. ६५ ते ७० टक्के रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. हाय रिस्क असलेले रुग्ण दगावले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, गाफिल राहता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
राज्यात पहिला रुग्ण आढळून पाच आठवडे झाले. आता गुणाकाराचा कालावधी आहे. त्याचा वेग मंद करण्यात यश आले आहे. रुग्णसंख्या शुन्यावर आणायची आहे. घरोघरी जाऊन चाचणी करतोय, अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
Nice