अकोला- जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे तसेच त्यासोबतच अलगीकरण विलगीकरणात निरिक्षणाखाली ठेवावयाच्या रुग्णांची संख्याही त्या प्रमाणात वाढत आहे. ही संख्या वाढत असतांनाच प्रशासनाने पुढची तयारी म्हणून डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या आवारात ५५ खोल्यांचे विलगीकरण कक्ष स्थापण्याचे आदेश आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.
या संदर्भात दिलेल्या आदेशात नमूद केल्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या आवारात असलेल्या वसतीगृह इमारती अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यात सावित्री (५० कक्ष), रुक्मीणी(४८ कक्ष), जिजाऊ (५७ कक्ष) या तीन इमारती मिळून १५५ कक्षांत विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात यावे असे निर्देशही जिल्हा शल्य चिकित्सकांना देण्यात आले आहेत. याठिकाणी या भागात क्वारंटाईन वैद्यकीय पथकाशिवाय अन्य कोणासही प्रवेश देण्यात येणार नाही. वैद्यकीय पथकाच्याही येण्या जाण्याच्या वेळा नोंदविल्या जातील. तसेच या ठिकाणी निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या व्यक्तिंची माहितीही गोपनीय ठेवावी असे आदेशात नमूद केले आहे. तसेच या संपूर्ण परिसरात अहोरात्र पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही पोलीस दलाला देण्यात आले आहेत.
दुध डेअरी सुरु ठेवण्याची वेळ वाढवली
जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने ( किराणामाल, भाजी पाला इ.) सकाळी सहा ते दुपारी १२ पर्यंतच खुल्या ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. या आदेशात आज अंशतः बदल करण्यात आला आहे. केलेल्या बदलानुसार दुग्धजन्य पदार्थ, डेअरी व्यवसाय सकाळी सहा ते दुपारी १२ व दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.