अकोला- अकोला जिल्ह्यात आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ९ झाली आहे. त्यामुळे अकोला शहरातील काही भाग, पातुर शहर व संलग्न भाग हे प्रशासनाने सील केले आहेत. प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजना मग त्यात घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी असो वा संचारबंदी असो ह्या केवळ कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आहेत, हे जाणून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करा व घरातच रहा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.
कोरोना या जागतिक महामारीच्या मुकाबल्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्व शासन यंत्रणा काम करीत आहे. जनतेने या विषाणूच्या संसर्गापासून स्वतःला वाचवणे हा एकमेव पर्याय व त्यासाठी लॉक डाऊन हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या स्वतःच्या घरात राहणे. केवळ जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर पडणे, बाहेर जातांना मास्क वापरणे व पुन्हा घरातच थांबणे, वारंवार साबणाने हात धुणे हा यावरील सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी प्रशासन रुग्ण आढळलेला भाग तीन किमी परिघापर्यंत सील करण्यात येत आहे.
त्यातील सर्व लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करुन सर्व माहिती द्या व त्यांना आपली तपासणी करु द्या. आपल्याला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होत राहिल यासाठी प्रशासन सर्व व्यवस्था करत आहे, आपण फक्त घरात राहून सहकार्य करायचे आहे, असे आवाहन ना. कडू यांनी केले आहे.