अकोला- जिल्ह्यात आज (सायं. पाच वा.) अखेर प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात दुसरा कोरोना संसर्गित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण अकोला शहरातील अकोट फैल भागातील रहिवासी आहे. आज दिवसभरात (गेल्या २४ तासात) १३ जण संशयित रुग्ण म्हणुन दाखल झाले. त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. आतापर्यंत १३६ नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यापैकी ९० जणांचे अहवाल प्राप्त झाले असून ८८ निगेटिव्ह आहेत. तर दोघा जणांचा अहवाल हा पॉझिटीव्ह आला आहे. दोघेही रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात विलगीकरण करुन दाखल करण्यात आले आहेत. अद्यापही ४६ जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. ४८ जण सध्या विलगीकरण कक्षात निरीक्षणात आहेत,अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिली.
जिल्ह्यात आजतागायत प्रवासी म्हणून २७१ जणांची नोंद झाली आहे. त्यातील ९५ जण अद्याप गृह अलगीकरणात आहेत. (७८ जण गृह अलगीकरणात तर १७ जण संस्थागत अलगीकरणात) तर १२७ जणांचा गृह अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. तर ४८ जण विलगीकरण कक्षात वैद्यकीय निरीक्षणात आहेत.