अकोला,दि.८– जिल्ह्यात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने जिल्हाप्रशासनाने संचारबंदीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. ज्या भागात रुग्ण आढळले आहेत ते बैदपुरा व अकोट फैल हे दोन भाग तर तीन किमी परिघापर्यंत सील केले आहेत. शिवाय उर्वरित जिल्ह्यासाठीही केवळ दवाखाने व वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार दुपारी १२ नंतर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
आज सकाळी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह येताच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या दालनात प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. त्यात जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तेरानिया, प्रांताधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.
बैदपुरा, अकोट फैल सील
यावेळी रुग्ण आढळलेले भाग म्हणजेच बैदपूरा व अकोट फैल या भागांना शहराच्या इतरा भागाशी जोडणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. आत केवळ शासकीय कर्तव्यावर असणारे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी , मनपा कर्मचारी आदींनाच आणि केवळ कामाकरताच प्रवेश असेल. शिवाय आतून कोणालाही बाहेर जाता येणार नाही व बाहेरुन कोणाला आत जाता येणार नाही. त्यासाठी या भागात केवळ सहा ठिकाणी येण्या जाण्याचे मार्ग राखीव ठेवण्यात आले आहेत ते सुद्धा नाकाबंदी करण्यात आले आहेत.
या दोन्ही भागातील मिळून तब्बल ६६ हजार व्यक्तींची आरोग्य तपासणी करावी लागणार असल्याने त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने १५० पथके गठीत केली आहेत. हीपथके घरोघरी जाऊन घरातील सदस्यांची आरोग्य तपासणी करुन माहिती घेतील. या पथकांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दुपारी १२ नंतर सर्व बंद
संचारबंदीचे निर्बंध अन्य भागांसाठीही कडक करण्यात आले आहेत. त्यात सकाळी सहा ते दुपारी १२ पर्यंत जीवनावश्यक वस्तू ( किराणा, भाजीपाला , दूध इ.) ची दुकाने उघडी राहतील. तर सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत बॅंक उघड्या राहतील. या कालावधीतच नागरिकांना खरेदी करता येईल. दुपारी १२ नंतर मात्र सर्व व्यवहार बंद करण्यात येतील. दुपारी १२ नंतर केवळ दवाखाने व वैद्यकीय सुविधा , औषधी दुकाने सुरु राहतील, असे स्वतंत्र आदेश जिल्हाप्रशासनाने जारी केले आहेत.
सामाजिक अंतर राखण्याचे आदेश
याच पार्श्वभुमिवर जिल्ह्यातील नागरिकांनी एकमेकांपासून चार ते पाच फुट अंतर राखावे. गर्दी करु नये. कोणत्याही समारंभाचे आयोजन करु नये. तोंडाला रुमाल अथवा मास्क लावावा. शक्यतो घराबाहेर पडू नका, आवश्यक सेवांसाठी घरपोच सेवांचा लाभ घ्या, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
बॅंकींग सेवा दुपारी १२ पर्यंतच
जिल्ह्यात बॅंकांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून संचार बंदीतून वगळलेल्या बॅंकांच्या सेवा या सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळातच उपलब्ध ठेवण्यात येतील असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत. या वेळात केवळ पैसे काढणे व ठेवणे याच सेवा दिल्या जातील. या काळात बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांचे सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर तसेच हात धुण्याची व्यवस्था ठेवणे या बाबींची व्यवस्था शाखा व्यवस्थापकांनी करावी,असे निर्देशही देण्यात आले आहेत. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
कॉमन सर्विस सेंटर मधूनही होईल पैसे देवाण घेवाण
बॅंकांच्या वेळेवर निर्बंध आल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्ह्यातील २०० हून अधिक कॉमन सर्विस सेंटर्स मधून डिजीटल पद्धतीने पैसे काढणे , पाठविणे यासारख्या बेसिक बॅंकिंग सेवा देण्यात यावी. त्यासाठी हे सीएससी सेंटर्स गुरुवार पासून सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.