अकोला- लॉक डाऊनच्या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात कोणीही उपाशी राहू नये यासाठी विविध सामाजिक व स्वयंसेवी संस्थांनी तसेच दानशूर व्यक्तींनी अन्नछत्र उघडली आहेत. या अन्नछत्रातून अन्न शिजवणे, त्याचे पॅकिंग करणे व ते थेट खाणाऱ्या पर्यंत पोहोचविणे या प्रक्रियेत सर्वत्र निर्जंतुकीकरणाचे सर्व नियम पालन केले जातायेत.
अकोला शहरात पोलीस लॉन्स येथे व खोलेश्वर येथे दोन मोठे कम्युनिटी किचन सुरु आहेत. याठिकाणी अत्यंत स्वच्छता व शुद्धता पाळून स्वयंपाक करुन लोकांपर्यंत अन्न पोहोचविले जात आहे. जेवण बनवणारे कारागिर व मावश्या यांना नेट कॅप, हॅन्ड ग्लोव्हज, मास्क यांचा वापर करुन स्वयंपाक बनवावा लागत आहे.
खोलेश्वर येथे तर चपात्या या मशिनने बनवल्या जातात. शक्यतो कुठेही मानवी हात लागणार नाही याची दक्षता घेण्यात येते. कारागिरांनी वापरावयाचे ॲप्रन्स सुद्धा सॅनिटाईज करुन घेतले जातात. तयार झालेले जेवण एअर टाईट कंटेनर मध्ये गरजूंपर्यंत बंदिस्त वाहनातून पोहोचविले जाते. मानव विकास बहुउद्देशीय संस्था, श्री सेवा ट्रस्ट, श्रीराम उत्सव समिती या व अशा विविध संस्था या कामात आपले योगदान देऊन शहराची एकमेकांस सहकार्य करण्याची परंपरा जपत आहेत.