अकोला (जिमाका)- कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून लॉक डाऊन करण्यात आला आहे. या परिस्थितीत शेतमाल बाजार समितीत आणून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासठी बाजार समितीतही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब व अंमलबजावणी करुन बाजार समितीचे कामकाज करावे असे निर्देश जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांनी दिले आहेत.
यासंदर्भातील निर्देश याप्रमाणे- उप निबंधक, सहाय्यक निबंधक यांनी व त्यांच्या अधिनस्त दोन कर्मचाऱ्यांनी दररोज बाजार समितीस भेट देऊन कोरोना विषणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घ्यावा. बाजार समितीत टोकन पद्धतीने शेतमालाची आवक घेण्यात यावी. तसेच कोणत्या दिवशी शेतमाल बाजारात आणावयाचा आहे याचे नियोजन करावे. बाजार समितीच्या आवारात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना राबविण्यासाठी संचालक मंडळास सांगावे, या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण व यासंदर्भातील तक्रार निवारण हे संबंधित उपनिबंधक , सहाय्यक निबंधक यांचे राहिल,असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रविण लोखंडे यांनी कळविले आहे.