अकोला(प्रतिनिधी): कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असतानाच कोविड-१९ या आजाराच्या संदर्भात विविध मेसेज व्हायरल करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर आता जिल्हा पोलीस प्रशासनाचे लक्ष राहणार आहे; मात्र तरीही जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीने कोरोनाची अफवा पसरविल्यास किंवा सोशल मीडियावर मेसेजेस व्हायरल केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी दिला आहे.
कोरोना या संसर्गजन्य विषाणूचे थैमान राज्यभर सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात कोरोना या आजाराविषयी जाणून घेण्याची तसेच वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे एक वेगळी भीती असल्याचेही वास्तव आहे; मात्र अशातच आता याला वेगळेच स्वरूप देण्यात येत आहे. त्यामुळे काही विशिष्ट समाजाविषयी सोशल मीडियावर मेसेजस व्हायरल करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या संकटासोबत जातीय दंगली भडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अकोलापोलिसांची सायबर सेलच्या माध्यमातून करडी नजर आहे. जिल्ह्यातील किंवा बाहेरील कोणत्याही व्यक्तीने तेढ निर्माण करणारा मेसेज व्हायरल केल्यास सायबर सेल काही क्षणातच तो क्रमांक शोधण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रत्येक आक्षेपार्ह मेसेजवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टीटर तसेच इतर प्रकारचे सोशल मीडिया यावरून अफवा पसरविणारा किंवा कुणाच्याही जाती, धर्माविषयी मेसेज व्हायरल केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९९१ चे कलम ६८ अन्वये पोलीस अधिकाºयांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार यापासून व्यक्तीचे संरक्षण कायदा २०१६ च्या कलम ५,७ अन्वये फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. या कलमान्वये ३ वर्षांची शिक्षा व एक लाख रुपये दंडाच्या शिक्षेचे प्रावधान आहे. यासोबतच कलम १५३, २९५, २९८, ५०५, १०७ प्रमाणे अफवा पसरविल्या तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५४ अन्वये संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी दिला आहे. यासोबतच आणखी विविध कलमान्वये अफवा पसरविणे तसेच सोशल मीडियावर मेसेज व्हायरल करणाºयांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा प्रकारचे कोणतेही मेसेज व्हायरल न करण्याचे आवाहन गावकर यांनी केले आहे.