अकोट (प्रतिनिधी ) : अकोट ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणी केल्यानंतर होम क्वारंटीनचा हातावर शिक्का मारलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकोट शहरात ७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. या वृद्धाने कोरोना विषाणूची धास्ती घेतल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अकोट तालुक्यातील मोहाळा येथील दादाराव नेरकर (६५) हे शहरातील एका धार्मिक संस्थेमध्ये वीणेकरी म्हणून सेवा करायचे. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी अकोट ग्रामीण रुग्णालयात २ एप्रिल रोजी तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी औषधोपचार केला. तसेच खबरदारी म्हणून १४ दिवस घरी राहण्याचा सल्ला देत, त्यांच्या हातावर होम क्वारंटीनचा शिक्का मारण्यात आला. त्यानंतर संस्थेमध्ये ते विलगीकरण स्थितीत राहात होते. ७ एप्रिल रोजी सकाळी दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. या घटनेची माहिती अकोट शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. अकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.