अकोला- प्रशासनाने लोकांना घरात बसायला सांगितले आहे. पण काही हौशे नवशे गवशे हे असतातच. मोटारसायकल काढून काही काम नसलं तरी चक्कर मारुन येण्यात अनेकांना फुशारकी वाटते. पण हे करतांना आपण आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटूंबियांसाठी किती मोठा धोका पत्करतोय याचे भान त्यांना नसते, किंवा कळते पण वळत नसते. अशा हौशा गवशांना वठणीवर आणण्यासाठी प्रत्यक्ष कोरोना रुपी यमराजच रस्त्यावर उतरलाय.
जिल्हा प्रशासनातले कल्पक अधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी ही अभिनव संकल्पना राबवून रस्त्यावर विनाकारण भटकणाऱ्यांना अटकाव केलाय. येथील भौरद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सर्जेराव देशमुख हे या एकपात्री प्रयोगाचे नायक ठरलेत. ते स्वतःकोरोनाच्या दैत्याची वेशभूषा करुन रस्त्यावर येतात. गळ्यात पोर्टेबल स्पिकर, कॉर्डलेस माईक, आणि रस्त्यावर आलेल्या बाईकस्वारांना ते आवाहन करु लागतात. तुम्हाला घरात थांबायला सांगितलंय, सगळ प्रशासन सांगतय, पण तुम्ही ऐकत नाहीत. आपल्या देशातील महान महान क्रांतीकारक देशासाठी इतका त्याग केला.आणि तुम्ही एवढाही त्याग करु शकत नाहीत? असा खडखडीत सवाल ते करतात. चौका चौकात जाऊन सर्जेराव देशमुख ही जनजागृती करीत आहेत.
त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक जण खजील होऊन चौकातुन काढता पाय घेतात आणि गुमान घरी जातात. सध्या तरी ही यमराजाची मात्रा लागू पडलीय असं दिसतंय. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, प्रांताधिकारी निलेश अपार, तहसिलदार विजय लोखंडे तसेच अन्य अधिकाऱ्यांनी देशमुख यांचे कौतूक केले आहे. आणि लोकांनी घरीच रहावे, असे आवाहन केले आहे.