वाशिम- संपूर्ण जगभरात कोरोना या आजाराने थैमान घातले असून, या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी शासन, प्रशासनाने कठोर पावले उचलली. 25 ते 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन चे आदेश देण्यात आले. महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण असून, आज, 3 एप्रिल रोजी वाशिम जिल्ह्यातही या आजाराचा रुग्ण आढळल्याने सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्ली येथील धार्मिक संमेलनात हा व्यक्ती सहभागी झाल्याची शक्यतेची माहिती आहे.
जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातही कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. वाशीम जिल्ह्यातही एकाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठविलेल्या या व्यक्तीच्या ’थ्रोट स्वॅब’ चा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून, जिल्हा प्रशासनाने याची पुष्टी केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत एक धार्मिक संमेलन झाले होते. या संमेलनात दोन हजारांपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते. या संमेलनात महाराष्ट्रातील 109 भाविकांचा सहभाग होता. वाशिम जिल्ह्यातील एक जण या संमेलनात सहभागी हजेरी लावून परत आल्याचा संशय जिल्हा प्रशासनाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित संशयितास विचारणा केली असता, त्या संमेलनात आपण गेलो नसल्याचे तो इसम सांगत होता. मात्र, खबरदारी म्हणून त्या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आणि त्याचे ‘थ्रोट स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज, 3 एप्रिल रोजी त्याच्या ‘थ्रोट स्वॅब’ चा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात त्याला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. वाशीम जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासन सतर्क झाले असून, सदर व्यक्ती किती लोकांच्या संपर्कात आला याची माहिती प्रशासन घेत आहे.