अकोला: भारत सरकारच्या आदेशानुसार महिलांच्या जन-धन बचत खात्यात आजपासून (दि.२) प्रत्येकी ५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे सानुग्रह अनदान एप्रिल, मे व जून महिन्यात जमा होणार आहे. त्या प्रमाणे आज एप्रिल चे पैसे जमा झाले आहेत.
कोविड १९ कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमिवर समाजशीलअंतर (Social distancing) राखण्याचे भान ठेवत लाभार्थ्यांची गर्दी होऊ नये म्हणून बॅंकेतून पैसे काढण्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे . खातेक्रमांकाचा शेवटच्या अंकानुसार पैसे काढण्याची तारीख देण्यात आली आहे. लोकांची पैसे काढण्यासाठी बॅंकेत गर्दी होऊ नये यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.
वेळापत्रक याप्रमाणे-
खाते क्रमांक शेवटचा अंक शून्य व एक(० व १) असेल त्यांच्यासाठी पैसे काढण्याची तारीख शुक्रवार दि. ३, खातेक्रमांक शेवटचा अंक दोन व तीन (२ व ३) असेल त्यांच्यासाठी शनिवार दि.४,
खातेक्रमांक शेवटचा अंक चार व पाच (४ व ५) असेल त्यांच्यासाठी मंगळवार दि.७,
खातेक्रमांक शेवटचा अंक सहा व सात (६ व ७) असेल त्यांच्यासाठी बुधवार दि.८,
खातेक्रमांक शेवटचा अंक आठ व नऊ (८ व ९) असेल त्यांच्यासाठी गुरुवार दि.९,
याशिवाय या सर्व लाभार्थ्यांना एटीएम तसेच बॅंक करस्पॉन्डन्ट मधून वा थेट शाखेतून हे पैसे मिळू शकतील.
गुरुवार दि.९ नंतर मात्र लाभार्थी केव्हाही आपल्या सोईने पैसे काढू शकतील, या सुचना सर्व बॅंकांना देण्यात आल्या आहेत, तरी लाभार्थ्यांनी पैसे काढण्यासाठी बॅंकेत गर्दी करु नये, असे जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक आलोक तारेनिया यांनी कळविले आहे.