अकोला: जिल्ह्यात संचारबंदी काळातही कोणतेही कारण नसतांना आपली वाहने घेऊन हिंडणाऱ्या रिकामटेकड्यांची वाहने जप्त करुन शास्त्री स्टेडीयम मध्ये संचारबंदी संपेपर्यंत ठेवण्यात यावीत,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पोलीस प्रशासनाला दिले असून गाड्या जमा करुन ठेवण्यासाठी शास्त्री स्टेडीयमची जागा वापरण्यास परवानगीही दिली आहे.
जिल्ह्यात कल्म १४४ लागू करण्यात आले असतांनाही या ना कारणाचे नाव सांगून उगाचच वाहने घेऊन भटकंती करणाऱ्यांची संख्या व उपद्रव वाढत चालला असून त्यामुळे कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा मूळ हेतू साध्य होत नाहीय. यामुळे लोक घराबाहेर पडून फिरत तर असतात पण हेच लोक नंतर पुन्हा आपल्या कुटूंबात जातात, सद्यस्थितीत हे धोकादायक ठरू शकते. लोकांना दैनंदिन आवश्यक वस्तू व सामान खरेदीसाठी विकेंद्रीत पद्धतीने उपलब्धता सर्वच भागात करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या घरापासून अगदी जवळच्या ठिकाणी लोक शक्यतो पायी जाऊन भाजीपाला, किराणा, आवश्यक औषधी खरेदी करु शकतात. मात्र काही लोक हे विनाकारण आपली दुचाकी चारचाकी वाहने घेऊन शहरात फिरत असतात. ह्या लोकांची चौकशी करुन त्यांचे बाहेर फिरण्याचे कारण संयुक्तिक नसल्यास त्यांची वाहने पोलीस आता जप्त करुन ती शास्त्री स्टेडीयमच्या जागेत ठेवणार आहेत. यासंदर्भात पोलिसांनी कडक कारवाई करावी व विनाकारण फिरणाऱ्यांना आळा घालावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.








