अकोला: कोरोना विषाणू (COVID-19) च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर पात्र लाभार्थींना माहे एप्रिल ते जुन या महिन्यांचे धान्य वाटपाबाबत दि.३१ मार्च रोजी शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अशा विविध योजनांद्वारे कशा पद्धतीने धान्य वितरण होईल याबाबतची कार्यप्रणाली व दिशानिर्देश जिल्हा पुरवठा विभागाने जारी केले आहेत.
त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजनेतील सर्व पात्र लाभार्थींना नियमितपणे मिळणारे धान्य गहु दोन रुपये प्रति किलो व तांदुळ तीन रुपये प्रति किलो या दराने एप्रिल, मे व जून या महिन्याचे धान्य त्या त्या महिन्यातच रास्तभाव दुकानांमधुन वाटप केले जाईल. त्याचप्रमाणे शासनाने घोषित केल्याप्रमाणे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व अंत्योदय योजनेमधील पात्र लाभार्थ्यांनाच प्रति व्यक्ती प्रति माह पाच किलो तांदुळ मोफत देण्यात येईल.
धान्य वाटप झाल्यानंतर ज्या पात्र लाभार्थ्यांनी नियमित धान्य उचल केली आहे याची खातरजमा झाल्यानंतरच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत वितरण सुविधा ePos मशीनवर उपलब्ध झाल्यानंतर त्या त्या महिन्यात मोफत वितरीत करण्यात येईल,असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे. धान्य घेतांना लाभार्थ्यांनी गर्दी करु नये तसेच परस्परात अंतर राखूनच धान्य घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना एप्रिल , मे व जुन महिन्यासाठी सिलेंडर मोफत मिळणार आहे. लाभार्थ्याच्या बँक खात्यात दि. चार पासुन सिलेंडरची मुळ किंमत केंद्र शासन जमा करेल. सिलेंडर घेतांना ती रक्कम संबधीत कंपनीच्या गॅस एजन्सीला द्यावी. प्रत्येक महिन्यात लाभार्थांच्या खात्यात त्या त्या महिन्याची सिलेंडरची मुळ रक्कम जमा होईल. प्रधानमंत्री उज्वला गॅस लाभार्थ्यांनी आपले बँक अकाउंट अद्यावत (update) करुन घ्यावे ही एजन्सीधारकांचीही संयुक्त जबाबदारी असेल.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आदेशामुळे बंद झालेल्या उद्योग व्यवसायातील कामगार, परराज्यातील विस्थापित कामगार व बेघर व्यक्ती यांच्यासाठी निवारागृह व अन्न, पाणी तसेच वैद्यकीय देखभाल या सुविधा स्वयंसेवी संस्थाच्या सहाय्याने केंद्रीय किचन व्यवस्थेच्या माध्यमातुन शिजवलेले/ शिजवण्यासाठी तयार अन्नाचा पुरवठा करण्याकरीता कम्युनिटी किचनमार्फत भोजन व्यवस्था करतांना संबधित संस्थांना धान्याचा शासकीय दराने गव्हाचा पुरवठा करण्यात येईल,असेही कळविण्यात आले आहे.