अकोला: कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यात बाहेरगावाहून आलेले लोक हे घरातच अलगीकरण करुन कसे राहतील याची अधिकाधिक खबरदारी घ्या, लोकांचा एकमेकांशी संपर्क होऊ देऊ नका, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.
जिल्ह्यातील संचार बंदी अंमलबजावणी अन्य अनुषंगिक बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा उपनिबंधक डॉ प्रवीण लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ठिकठिकाणी सुमारे १५ हजार लोक हे मुंबई, पुणे,नागपूर यासारख्या जिल्ह्यातून व परप्रांतातून आलेले आहेत. या सर्व लोकांच्या हातावर शिक्का मारुन त्यांना घरातच अलगीकरण करुन ठेवा, यासाठी सर्वतोपरी खबरदारी घ्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याचा भंग करणाऱ्यांसाठी तालुकास्तरावर स्वतंत्र अलगीकरणाची व्यवस्था निर्माण करुन त्यांना तेथे ठेवा.
जिल्ह्याच्या, गावाच्या सिमा बंद
लोक गावांमधून इकडे तिकडे जाता कामा नये. तसेच जिल्ह्याच्या सिमाही बंद करा. केवळ अत्यावश्यक सेवांशी निगडीत वाहतुक सुरु असल्याने त्या व्यतिरिक्त अन्य वाहतुक दिसल्यास त्या लोकांनाही तेथेच अडवा. जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांलगत असणाऱ्या गावांत अशा लोकांच्या राहण्याची, जेवणाची, पिण्याचे पाणी इ. सुविधा देता येतील अशी व्यवस्था सज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले.
घरपोच धान्य व भाजीपाला
लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी घरपोच धान्य व भाजीपाला देण्याच्या व्यवस्थेचे नियोजन कृषि विभाग व सहकार पणन विभागामार्फत सुरु आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने मागणी नोंदवून त्याप्रमाणे आवश्यक साहित्य सामुग्री घरपोच करण्यात येईल. त्यासाठी सुद्धा पोलीस व मनपा कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करता येईल असे त्यांनी सांगितले.
प्रत्येकाला जेवण मिळायलाच हवे
या सर्व अभूतपूर्व परिस्थितीत कोणतीही व्यक्ती ही जेवणाशिवाय राहता कामा नये अशा सक्त सुचना जिल्हाधिकारी पापळकर यांनी यंत्रणेला दिल्या. एखादी व्यक्ती बेघर नसेल पण कदाचित त्या कुटूंबाकडे अन्नधान्य उपलब्ध नसेल, असेही असू शकते याचा विचार करा. त्यासाठी तीन महिन्याचे रेशन लवकरात लवकर असे वितरीत करता येईल याचे नियोजन करुन ते शक्यतो घरपोच वितरीत करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.