बुलडाणा : येथील शासकीय जिल्हा सामान्य रूग्णालयात काल सकाळी मृत्यू झालेल्या कोरोना संशयित रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली आहे.
त्या रूग्णाला काल शनिवारी सकाळी जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तासाभरात त्याचा मृत्यू झाला होता. तत्पूर्वी शहरातील एका खासगी रूग्णालयात न्युमोनिया आजारामुळे तो रूग्ण भरती झाला होता. त्याचे स्वॅब नमुने नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह’ आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय ४७ असून ते न्युमोनिया व मधूमेह आजाराने त्रस्त होते.
राज्यावरील कोरोना संकट अधिकच गंभीर होत चालले आहे. आज (ता. २९) राज्यात सात कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यामध्ये मुंबईमधील चार जणांचा समावेश आहे. तर पुणे, नागपूर आणि सांगलीतून प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या १९३ झाली आहे.