अकोला (जिमाका)- कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भावास प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अकोला महानगरपालिकेतर्फे शहरात सर्वेक्षण सुरु आहे. या सर्वेक्षणात बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांचे स्क्रिनिंग, तपासणी करण्यात येणार आहे. त्याचे हातावर स्टॅम्पिंग करुन त्यांना १४ दिवस घरातच राहण्याबाबत सांगण्यात येणार आहे, अशी माहिती मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी दिली. दरम्यान शहरात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणीही आज पासून सुरु झाली आहे.
यासंदर्भात एक नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला आहे. शहरात विविध भागात बाहेरगावाहून दाखल झालेल्या लोकांचे सर्वेक्षण सुरु झाले असून त्यासाठी महानगरपालिकेचे चारशे हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यात पुणे, मुंबई या सारख्या शहरातून आलेल्या व्यक्तिंची तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्या हातावर स्टॅम्पिंग करुन त्यांना घरातच राहण्यास सांगण्यात येत आहे. यासंदर्भात महापालिकेत एक नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात आला असून ०७२४-२४३४४१२ व १८००२३३५७३३ हे चोवीस तास कार्यान्वित हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले आहेत. आपल्या अवतीभवती बाहेरगावाहून आलेल्या लोकांची माहिती, तसेच अन्य तक्रारी व सुचनांसाठी या कक्षात संपर्क करावा असे आवाहन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे.
तसेच शहरात पाच ट्रॅक्टर्सद्वारे विविध भागात सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी सुरु झाली आहे. याबाबतही नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.