हिवरखेड(धिरज बजाज):-
हिवरखेड येथील श्री नंदूसेठ लखोटिया यांच्या शेती साहित्याचे गोदामाला आणि गोठ्याला सोमवारी सकाळी अचानक भीषण आग लागली.
सदर आगीने पाहता-पाहता काही क्षणातच रौद्ररूप धारण केले आगीचे मोठे मोठे लोळ आणि काळ्या धुराचे प्रचंड लोट उठत असताना नागरिकांना दिसताच गोर्धी वेस, बगीच्या, बंदूक पुरा, राजधानी चौक, मेडिकल चौक, महाराजा अग्रसेनजी मार्ग, मराठा नगर, मेन रोड, विकास मैदान इत्यादी गावातील संपूर्ण परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जीवाची बाजी लावत आणि कशाचीही पर्वा न करता मिळेल तेथून पाणी घेऊन तसेच विविध साहित्य घेऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी नागरिकांनी फायर ब्रिगेड ला फोन केला परंतु सदर 102 नंबर अकोल्याला लागत होता. त्यामुळे
सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार यांनी तेल्हाराच्या नगराध्यक्ष सौ जयश्रीताई पुंडकर आणि अकोट येथे दिलीप भाऊ बोचे, नवणीतजी लाखोटीया यांना फोन करून तात्काळ अग्निशमन दलाची गाडी पाठविण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत अग्निशमन पथक रवाना केले. तसेच सरपंचांना फोन करून त्या भागातील पाणीपुरवठा तात्काळ सोडण्याची विनंती करण्यात आली. नळ आणि बोअरवेल च्या सहाय्याने शेकडो नागरिकांनी आपल्या घरातून पाणी आणून आणि पाईप द्वारे शक्य तेवढे प्रयत्न केले. हिंदू मुस्लिम बांधवांनी शर्तीचे प्रयत्न केले नसते तर ही आग आजूबाजूच्या घरात आणि संपूर्ण वस्तीत पसरली असती. त्यानंतर प्रथम तेल्हारा आणि नंतर अकोट येथील अग्निशमन दलाची गाडी पोहोचली आणि आग पूर्णपणे विझविण्याची कार्यवाही सुरू केली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून गोठ्यातील गुरेढोरे सुद्धा वेळीच इतरत्र हलविण्यात आली. या घटनेत जनावरांसाठी असलेली अनेक क्विंटल कुट्टी जुने सागवान लाकूड ड्रिप च्या नळ्या आणि अनेक प्रकारचे शेती उपयोगी साहित्य जळून पूर्णतः भस्मसात झाले. घटनास्थळावर आग विझविणाऱ्या शेकडो नागरिकांसह अकोट तेल्हारा अग्निशमन दल, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, जागरूक नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, महावितरण कर्मचारी, हिवरखेड पोलीस कर्मचारी, अनेक शेतकरी व्यापारी, मजूर वर्ग, इत्यादी सर्वच स्तरातील नागरिकांचे सहकार्य मिळाले
*हिंदू मुस्लिम एकात्मतेचे दर्शन*
हिंदूं सोबतच शेकडो मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेत खांद्याला खांदा लावून आपला जीव धोक्यात घालत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सदर आगविझविताना अनेक हिंदू मुस्लिम बांधवांना किरकोळ इजा आणि दुखापती सुद्धा झाल्या परंतु त्याची तमा न बाळगता सर्वांनी भीषण आग विझविण्यावरच लक्ष केंद्रित केले.
यानिमित्ताने ही लागलेली भीषण आग तर विझलिच सोबतच काही अज्ञात समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून जी आग लोकांच्या मनात लावण्याचा प्रयत्न करतात ती आग सुद्धा येथे दिसलेल्या हिंदू-मुस्लिम ऐकतेमुळे विझली असल्याचे चित्र दिसत होते.