हिवरखेड (धीरज बजाज)- मागील 20 वर्षांपासून मागणी असलेल्या आणि विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपरिषद अथवा नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न सुरू होते. परंतु उदासीन आणि संवेदनाशून्य लोकप्रतिनिधीमुळे आजपर्यंत नगरपरिषदेची मागणी पूर्ण झाली नाही.
परंतु आता अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ, हिवरखेड ग्रामपंचायत, हिवरखेड विकास मंच, लोकजागर मंच आणि जागरूक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते इत्यादिंच्या सततच्या आणि उच्चस्तरीय पाठपुराव्यामुळे हिवरखेड नगरपरिषद निर्मितीच्या घडामोडींना वेग आला आहे.
हिवरखेड ग्रामपंचायत मार्फत नगर विकास मन्त्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांना हिवरखेड नगरपरिषदचा प्रस्ताव सादर करण्यात आला. सोबतच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हिवरखेड नवी तालुका निर्मिती संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. सोबतच महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन हिवरखेड नगरपरिषद आणि हिवरखेड नवीन तालुका निर्मिती करण्याबाबत साकडे घालण्यात आले. त्यावर आदित्य उद्धव ठाकरे यांनी या दोन्ही मुद्द्यांवर विशेष लक्ष घालून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले यावेळी माजी सरपंच सुरेश ओंकारे, रविंद्र वाकोडे, अजीज खा, हिफाजत खा, ग्राम विकास अधिकारी भीमराव गरकल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
दुसरीकडे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे धिरज बजाज, संदीप इंगळे, अर्जुन खिरोडकार, सुरज चौबे, जितेश कारिया, राजेश पांडव, राहुल गिर्हे, अनिल कवळकार, जावेद खान, उमर बेग, मोहन सोनोने, दीपक कवळकार, इत्यादी अनेक पत्रकारांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना हिवरखेड नगर पंचायत संबंधित माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यापर्यंत केलेल्या संपूर्ण पाठपुराव्याची फाईल निवेदनासह सुपूर्द करण्यात आली.
अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे गुरुदेव इसमोरे यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर हिवरखेड नगरपरिषद निर्मिती पूर्णत्वास नेणार असल्याचे सांगितले.
सोबतच विविध जागरुक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, आणि इतर संघटना सुद्धा आपल्या परीने या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत.
पालकमंत्री बच्चुभाऊ कडू यांची लवकरच भेट घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते हिवरखेड नगर परिषदेचा निर्णय तात्काळ घोषित करावा अशी विनंती करणार आहेत.
हिवरखेड नगरपरिषद करण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव, ग्रामसभेचे अनेक ठराव, सर्व सतरा सदस्यांच्या संमतीचा मासिक सभेचा ठराव, इत्यादी आवश्यक दस्तावेज वरिष्ठ कार्यालयात आधीच पोहोचते झालेले आहेत.