मुंबई – रोही (नीलगाय) व माकड ( वानर )या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच जखमी झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या व्यक्तींना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासंबंधीचा शासन निर्णयही जारी करण्यात आल्याची माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
या शासन निर्णयानुसार रोही व माकडाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसास 15 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. या रकमेपैकी तीन लक्ष रुपये तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित बारा लक्ष रुपये वारसाच्या राष्ट्रीयकृत बँकेत असलेल्या दरमहा व्याज देणाऱ्या संयुक्त खात्यात ठेव रक्कम जमा करण्यात येणार आहे. रोही व माकडाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना एक लाख 25 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येईल तर किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी येणारा खर्च देण्यात येईल. मात्र खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास 20 हजार रुपये प्रति व्यक्ती अशी त्याची मर्यादा असेल. या हल्ल्यात कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्या व्यक्तीला पाच लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल अशी माहिती मंत्री राठोड यांनी दिली.
आतापर्यंत वाघ, बिबट्या, गवा (बायसन)रानडुक्कर ,लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यांमुळे मनुष्यहानी झाल्यास शासनाकडून अर्थसहाय्य देण्यात येत होते. त्यात आता रोही व माकड या वन्य प्राण्यांचाही समावेश करण्यात आला असून या हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तसेच जखमींना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.