अकोला,दि.२५(जिमाका)- जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्यात होणाऱ्या विकासकामांचे नियोजन हे परिपूर्ण असले पाहिजे, जेणेकरुन जनतेला वेळेत या विकासकामांचा लाभ झाला पाहिजे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार कल्याण विभागाचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज येथे दिले. जिल्हा नियोजन समितीच्या आजच्या बैठकीत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याच्या २२३ कोटी ९४ लाख ५८ हजार रुपयांच्या नियतव्ययाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.
येथील नियोजन सभागृहात आज जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रतिभाताई भोजने, विधानपरिषद सदस्य आ. गोपीकिशन बाजोरिया, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. नितीन देशमुख तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख आदी उपस्थित होते.
यावेळी सन २०२०-२१ साठी सर्वसाधारण योजनेसाठी १२५ कोटी ५४ लाख रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ८६ कोटी ३१ लाख रुपये तर आदिवासी उपयोजनेसाठी १२ कोटी ९ लाख ५८ हजार अशा एकूण २२३ कोटी ९४ लाख ५८ हजार रुपयांच्या नियतव्ययाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. तसेच गत आर्थिक वर्षातील खर्चाचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील विविध यंत्रणांनी नियोजन समितीच्या निधीतून करावयच्या विकासकामांचे नियोजन काटेकोर करावे, विहित वेळेत कामे पूर्ण होतील याची खबरदारी घ्यावी, अशा सुचनाही केल्या. यावेळी झालेल्या चर्चेत लोकप्रतिनिधींनी सहभाग घेतला.
०००००
पालकमंत्री ना. बच्चू कडु यांनी घेतला विविध विभागाचा आढावा
अकोला,दि.25 (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, महिला व बालविकास, शालेय शिक्षण व कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडु यांनी आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात विविध विभागाचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, नियोजन अधिकारी ज्ञानेश्वर आंबेकर उपस्थित होते.
मत्स्यविकास विभागाचा आढावा घेतांना पालकमंत्री ना. कडु म्हणाले की, खारपाणपट्ट्यात शेततळ्याद्वारे मत्स्य व्यवसाय करण्यासाठी चालना द्यावी, शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून मत्स्य शेतीचा विकास करावा तसेच मत्स्य विभाग विभागांचे प्रक्रिया उद्योगासाठी प्रस्ताव तयार करावे असे निर्देश ना. कडु यांनी संबंधीतांना दिले.
प्रत्येक तालुक्यातील एक शाळा दत्तक घेणार असल्याचे सांगुन ना. कडु पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सर्व शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, रोहयोतून शाळा बांधकाम, अपंग, आई-वडील नसलेल्या अनाथ विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले वितरण आदी योजना राबविण्याबाबत सुचना दिल्यात. शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी शेतात अंधाराचा त्रास होवू नये यासाठी रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्थेसाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार करावे, अशा सुचना विद्युत विभागाला ना. कडु यांनी दिल्यात. विजेबाबत कोणतीही तक्रार येऊ नये यासाठी तक्रार मुक्त फिडर संकल्पना राबविण्यात यावी अशा सुचना त्यांनी दिल्यात. अकोल्यात शहिद स्मारक, बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा उपाययोजना, खारपाणपट्टयात विविध योजनांचे एकत्रीकरण, अवैध सावकार, सहकारी पाणी वापर संस्था, नदीकाठच्या गावात पावसाळ्यात पाणी घुसून नुकसान होते. अशा गावांसाठी पुर नियंत्रण योजना नेरधामणा बॅरेजच्या पाण्याखाली जात असलेल्या रस्त्यांसाठी पुल बांधणे, खारपाणपट्टयातील गावात गोड पाणी उपलब्ध् करून देण्याबाबत उपाययोजना, मुख्यमंत्री सडक योजना, मनरेगातून पादंण रस्ते आदि योजना राबविण्याबाबत संबंधीत विभागांना सुचना दिल्यात.
यावेळी मत्स्य विकास विभाग, जिल्हा परिषद सेस फंड, लघु पाटबंधारे विभाग, जिल्हा निबंधक सहकारी संस्था, सिंचन विभाग, सार्वजनिक बांधकाम, प्रधानमंत्री सडक योजना, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी, वनविभाग, सामाजिक वनिकरण आदि विभागाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.