आलेगाव : जिल्हा परिषदेच्या शाळेत आयुष्यभर विद्यादानाचे कार्य करताना एका शिक्षकाला वर्गातच हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास आलेगाव जिल्हा परिषद शाळेत घडली. शाळेत तिसर्या वर्गात शिकवित असताना शिक्षक सुरेश कोरकणे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते खुर्चीतून वर्गातच कोसळले. यावेळी विद्यार्थ्यांनी आरडा – ओरडा केल्याने तातडीने त्यांचे सहकारी धावून आले. त्यांना अकोला येथे उपचारार्थ भरती करण्यात आले, मात्र काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.
पातूर पंचायत समिती अंतर्गत आलेगाव येथील शिक्षक सुरेश शंकरराव कोरकणे (57) हे गेल्या अनेक वर्षांपासून पातूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषदेच्या आलेगाव येथील मराठी मुलांच्या शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य करीत होते. विशेष म्हणजे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या कमी होत असल्याच्या काळात ते घरोघर जाऊन पालकांना जिल्हा परिषद शाळेत पाल्यांना प्रवेश देण्याबाबत जागृती करत होते.दरम्यान आज सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर आलेगाव येथील त्यांच्या घरी अंतिम संस्कार होणार आहेत त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.