हिवरखेड (धीरज बजाज)- मुलगा नसला तर अंत्यविधी कोण करेल, असा सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडतो; मात्र हिवरखेड येथील एक मुलगा नसलेल्या वृद्धेला चार मुलींनीची चिताग्नी देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
हिवरखेड येथील वॉर्ड क्र. २ मध्ये राहणाऱ्या माया दिवाकर पिंजरकर यांचे अल्पश: आजाराने २४ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांना चार मुली आहेत. यापैकी तीन मुली विवाहित तर एक मुलगी अविवाहित आहे. यामध्ये शीतल रवींद्र दाभाडे, तेल्हारा भारती छोटू बाळापुरे, पाथर्डी, दिव्या सागर लोणकर, पुलगाव, अविवाहित विधी दिवाकर पिंजरकर आदींचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून माया पिंजरकर ह्या आजारी होत्या. मुलगा नसल्याने आपला अंत्यविधी कसा होईल, अशी चिंता होती. त्यांनी मोठी मुलगी शीतल रवींद्र दाभाडे व त्यांच्या शेजारी राहणारे राजेंद्र लोखंडे यांना आपली शेवटची इच्छा बोलून दाखविली की, माझा अंत्यविधी माझ्या मुलींनी करावा. आईची इच्छा पूर्ण करण्याच्या निर्धार करून चारही मुलींनी २५नोव्हेंबर रोजी अंत्यविधी पार पाडला.
यावेळी चारही मुलींनी आईच्या पार्थिवाला खांदा देऊन स्मशानभूमीत जाऊन पूर्ण अंत्यविधीचे सोपस्कार पूर्ण केले. मुलींनी आईचा अंत्यविधीचा पूर्ण सोपस्कार पार पाडून नवी दिशा देण्याचे काम केले आहे.