अकोला (दीपक गवई)- अतिवृष्टी, बँकांची दिवाळखोरी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योग धंदे, आरोग्य, शिक्षण आदी समस्यांवर तातडीच्या उपाययोजना करण्यात याव्यात या मागणीसाठी काँग्रेस तर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. शांततेत बसलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी फक्त शोबाजी केल्याचे दिसून आले.
महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी नुकसानीचे पचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदेश दिले असले तरी अधिकारी आणि कर्मचारी रजेवर असल्यामुळे पंचनामे दिवाळीनंतर करु असे, असंवेदनशीलतेचे उत्तर प्रशासनाकडून मिळत आहे. राज्याच्या हंगामी मुख्यमंत्र्यांनी तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही घेवन हेक्टरी नुकसान भरपाई त्वरीत जाहीर करण्याची आवश्यकता आहे.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशभर आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योग धंदे, व्यवसाय आणि सेवा ठप्प झाले आहेत. त्याचा विपरीत परिणाम महाराष्ट्रातील युवक शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब, मागास,अल्प संख्यांक आणि दारीद्रय रेषेखालील लोकांना सहन करावा लागत आहे. गेल्या ७० वर्षात भारताच्या वित्तीय क्षेत्रात कधी नव्हे, अशीपरिस्थिती आल्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष राजीवकुमार यांनी नकतेच सांगितले. मध्यमवर्गीयाचे उत्पन्न वाढीसाठी खाजगी क्षेत्राला गुंतवणकीसाठी प्रोत्साहित करण्याचा सल्ला त्यानी सरकारला दिला आहे. तर देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यानी देशातील अर्थव्यवस्थेला चिताजनक परिस्थितीतन बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारला लोकांशी चर्चा करुन सुडाचे राजकारण सोडून अर्थव्यवस्था सुधारण्या साठी उपाययोजना करण्याचे,आवाहन काँग्रेसच्या निवेदनातून करण्यात आले.