हिवरखेड(दिपक रेळे)- हिवरखेड सहदेवराव भोपळे विद्यालयात पोलीस विभाग हिवरखेड पोलीस स्टेशन च्या वतीने भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीदिनी बालकाची सुरक्षितता जनजागृती सप्ताहांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थाध्यक्ष अनिलकुमार भोपळे हे होते. मार्गदर्शक म्हणून ठाणेदार आशिष लव्हागळे व पोलीस महिला कर्मचारी प्रणिताताई वाशीमकर यांची उपस्थिती होती. तसेच या कार्यक्रमासाठी संस्थेचे सहकार्यवाह श्यामशील भोपळे, संचालक सुनील राऊत, प्राचार्य प्रमोद जानोतकर, माजी सैनिक मनोहर कवळकार व शिक्षक पालक संघाचे माजी उपाध्यक्ष गोवर्धन गावंडे हे होते.
यावेळी उपस्थितांनी स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले. यावेळी पोलीस महिला कर्मचारी प्रणिताताई वाशीमकर यांनी महिला सुरक्षितेविषयी मार्गदर्शन केले. तर ठाणेदार आशिष लव्हागळे प्रत्येकाने सुरक्षितेसाठी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगून काही अडचणी वा तक्रार असल्यास कुठलीही भीती न बाळगता मनमोकडेपणाने पालक व शिक्षकांना सांगावे जेणेकरून आपणास संरक्षण मिळू शकेल. तसेच बालकाच्या हक्काविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन जेष्ठ शिक्षिका कु. रजनीताई वालोकार तर आभारप्रदर्शन प्रा.संतोषकुमार राऊत यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.