हिवरखेड(धीरज बजाज)- विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्यासाठी हिवरखेड वासियांचा विविध माध्यमातून शांततामय मार्गाने अनेक वर्षांपासून सतत पाठपुरावा सुरू आहे. परंतु अजून पर्यंत हिवरखेड नगरपंचायत चा विषय मार्गी लागला नव्हता. परंतु हार न मानता हिवरखेड वासीयांनी आपापल्या स्तरावरून प्रयत्न सुरूच ठेवले. हिवरखेड विकास मंच चे संयोजक आणि लोकजागर मंच चे सहसचिव धिरज बजाज यांच्या पाठपुराव्याची दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तात्काळ सकारात्मक पावले उचलत तेल्हारा तालुक्याचे गटविकास अधिकाऱ्यांना हिवरखेड नगरपंचायत करण्याकरिता आवश्यक कारवाई करण्याबाबत आणि परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे पत्राद्वारे निर्देश दिले आहेत.
सीईओ आयुष प्रसाद यांच्या निर्देशानंतर गटविकास अधिकारी यांनी धिरज बजाज यांच्या निवेदनानुसार हिवरखेड सरपंच आणि सचिवांना पत्राद्वारे हिवरखेड नगरपंचायत करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे आणि गटविकास अधिकार्यांकडे सादर करण्याचे पत्र योग्य कारवाईसाठी तात्काळ दिले आहे. धिरज बजाज, हिवरखेड विकास मंच, लोकजागर मंच यांनी हिवरखेड सर्वात मोठी ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतला मिळणाऱ्या निधीच्या प्रमाणात विकासाचा प्रचंड अनुशेष आहे. हिवरखेडची लोकसंख्या खूप जास्त असल्याने हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करणे अत्यावश्यक असल्याचे आणि नगरपंचायतसाठी हिवरखेड ग्रामसभेचे अनेक ठराव मंजूर झाले असल्यावरही अनेक वर्षांपासून हि मागणी अपूर्ण असल्याने हिवरखेड नगरपंचायतचा विषय लवकर मार्गी लावून हिवरखेड वासियांना न्याय मिळवून देण्याबाबत विनंती केली होती.
उपरोक्त सर्व मुद्यांचा उल्लेख मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी हिवरखेड नगरपंचायत करण्यासाठी दिलेल्या पत्रात केलेला असल्याने त्यांची कर्तव्य तत्परता आणि आत्मीयतेची प्रचिती येते. विशेष म्हणजे सर्व मतभेद विसरून सत्ताधारी आणि विरोधी गटातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी हिवरखेड नगरपंचायत होण्यासाठी पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे लवकरच हिवरखेड नगरपंचायत चा विषय मार्गी लागण्याचा विश्वास नागरिकांना होत आहे..
प्रतिक्रिया
ग्रामपंचायतला मिळणाऱ्या निधीमध्ये हिवरखेडचा विकास अशक्य असल्याने हिवरखेड नगरपंचायत झाल्यास विकासाला चालना मिळेल. नगरपंचायतची मागणी लवकर पूर्ण व्हावी.
सौ.अरुणाताई सुरेश ओंकारे, सरपंच हिवरखेड.
हिवरखेड नगरपंचायतसाठी ceo आयुष प्रसाद साहेबांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आमची मागणी पूर्ण होईल असा विश्वास आहे. पण किचकट प्रभागरचना पाहता जि.प. निवडणुकीपूर्वी हा विषय मार्गी लागणे अत्यंत गरजेचे आहे.
धिरज बजाज, संयोजक हिवरखेड विकास मंच.
हिवरखेड नगरपंचायत बाबत वरिष्ठांचे पत्र मिळाले असून हिवरखेड सर्व निकषात पात्र ठरत असल्यामुळे लवकरच परिपूर्ण प्रस्ताव वरिष्ठांना पाठविण्यात येईल.
भिमराव गरकल,
ग्रामविकास अधिकारी, हिवरखेड