अकोला(प्रतिनिधी)- विदर्भात लिंबूचे सर्वाधिक उत्पादन बाळापूर-पातूर तालुक्यात घेतले जाते. परतीच्या पावसामुळे या दोन्ही तालुक्यांतील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाच्या पीक विमा योजनेत लिंबूचा समावेश करून कृषी विभागाने सर्वच पिकांचा केलेला सर्व्हे विमा कंपनीला बंधनकारक करण्याच्या मुद्यावर शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी शुक्रवारी मुंबईत राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्यासोबत प्रदीर्घ चर्चा केली. यावर दोन्ही विषय निकाली काढण्यासंदर्भात कृषी सचिव डवले यांनी आश्वस्त केले.
परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. कापूस, तूर, ज्वारी, सोयाबीन व मका या पिकांसह फळबागा अक्षरश: भुईसपाट झाल्या आहेत. शेतकºयांवर आलेल्या अस्मानी संकटातून त्यांना दिलासा देण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या स्तरावर शासन दरबारी पाठपुरावा केला जात आहे. परतीच्या पावसाने सर्वत्र नुकसान केल्यामुळे पीक विमा काढणाºया कंपनीच्या फेरसर्वेक्षणाची आवश्यकता राहिली नसल्याच्या मुद्यावर बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी शुक्रवारी राज्याच्या कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. ज्या शेतकºयांनी पीक विमा काढला नसेल, त्यांनाही मदतीसाठी पात्र ठरविण्याची गरज निर्माण झाली आहे. विदर्भातून लिंबूचे सर्वाधिक उत्पादन जिल्ह्याच्या बाळापूर व पातूर तालुक्यात घेतले जाते.
संततधार पावसामुळे लिंबू उत्पादनाला मोठा फटका बसल्यामुळे पीक नुकसानात लिंबूचा समावेश करण्याची मागणी आ. देशमुख यांनी सचिव एकनाथ डवले यांच्यासोबत चर्चेदरम्यान केली.