हिवरखेड (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील अकोट आणि तेल्हारा तालुक्यांमधील बहुतांश रस्त्यांची अत्यंत खस्ता हालत झाल्यामुळे मागील काही महिन्यातच अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. आणि अनेक नागरिक अपघातग्रस्त झाले आहेत. थर्ड क्लास रस्त्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली असून वाहने रस्त्यात फसने, बंद पडणे, अपघात या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सोमवारी संध्याकाळी हिवरखेड अकोट राज्य महामार्ग क्रमांक 47 वर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चितलवाडी फाट्या वर दोन दुचाकींना भीषण अपघात झाला यामध्ये दोन्ही दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाले असून गंभीर जखमींमध्ये सतीश इंगळे राहणार वरुडा, मुऱ्हादेवी जवळ तालुका अंजनगाव, परवेज इजराईल सौदागर राहणार विहिगाव तालुका अंजनगाव आणि राजपाल बेठे राहणार बोरव्हा तालुका तेल्हारा यांचा समावेश आहे. गंभीर जखमींना प्राथमिक उपचार करून अकोला येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
अपघात ग्रस्तपैकी दोघेजण आमदार बच्चुभाऊ कडू यांची हिवरखेड येथे होत असलेल्या सभेसाठी मोटरसायकलवर येत होते. तर दुसरीकडून राजपाल बैठे हे अकोट कडे जात होते. खराब रस्त्यांमुळे भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यापैकी एका गाडीवर गाडी नंबर नसून बच्चुभाऊ कडू यांचा फोटो आणि प्रहार असे लिहिलेले आहे तर दुसऱ्या दुचाकीचा क्रमांक एम एच 30 एक्स 6977 असल्याची माहिती मिळाली. या अपघातात दुचाकींचा प्रचंड चुराडा झाला असून दोन्ही दुचाकी नामशेष अवस्थेत होत्या वरकड पोलिसांनी दोन्ही दुचाकी पोलिस ठाण्यात जमा केल्या आहेत. वृत्तलिहिस्तोवर कोणीही पोलिसांमध्ये फिर्याद दिली नव्हती.
या रस्तावर चालून सरकारच्या अखत्यारित येत असलेल्या एसटी महामंडळाच्या बसेस पूर्णतः भंगार झाल्या असून थिगळ लावून एसटी बसेस रस्त्यांवर धावत नसून कश्यातरी रेंगाळत आहेत. एकाच दिवशी तब्बल चार वाहने दीर्घ काळ पर्यंत रस्त्यातच अडकल्याची घटना हिवरखेड परिसरात नुकतीच घडली होती.
सर्व प्रमुख रस्ते भकास आणि थर्ड क्लास झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. आणि लोक मतदानाच्या माध्यमातून याप्रकरणी ठोस भूमिका बजावण्यास सज्ज असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.