कणकवली (प्रतिनिधी)- स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्नशील असलेले माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांना आज दिलासा मिळाला. राणेंचे सुपुत्र व कणकवलीचे आमदार नीतेश राणे यांना आज अखेर भाजपमध्ये प्रवेश मिळाला. कणकवलीतून ते भाजपचे उमेदवार असतील, हे स्पष्ट झालं आहे. राणेंच्या भाजप प्रवेशावर शिवसेनेची प्रतिक्रिया काय असेल, याकडं आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेच्या विरोधामुळं नारायण राणेंचा भाजप प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबद्दल स्पष्ट काही बोलणं टाळलं होतं. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान मुख्यमंत्री याबद्दल घोषणा करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, तिथंही मुख्यमंत्र्यांनी घोषणा करणं टाळलं. त्यामुळं राणे कोंडीत सापडले होते. अखेर आज त्यांची ही कोंडी दूर झाली.
कणकवलीमधून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीतच कणकवलीच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. नारायण राणे यांच्याबद्दलचा कुठलाही निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊनच केला जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. असं असलं तरी शिवसेनेचे सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर अखेरपर्यंत राणेंच्या प्रवेशाला विरोध करत होते. हिंसक प्रवृत्तीला थारा देऊ नका, असं आवाहनच त्यांनी भाजपला केलं होतं. त्यामुळं भाजप राणेंना किंवा त्यांच्या मुलाला थेट पक्षात प्रवेश देईल का, याबाबत साशंकता होती. मात्र, नीतेश राणेंचा प्रवेश झाला आहे. हा निर्णय शिवसेनेच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन झाला का, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. नसेल तर त्यावर शिवसेनेची काय प्रतिक्रिया असेल, याबद्दलही उत्सुकता आहे.
महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी येत्या २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे. हरयाणा विधानसभेच्या ९० जागांसाठी मतदान होत आहे.