तेल्हारा (प्रतिनिधी)- स्थानिक डॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा. एम पी चोपडे हे होते. व्यासपीठावर राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. कृष्णा माहुरे, तसेच राज्यशास्त्र विभागाचे प्रा. कुंडलवाड प्रा.कु. चिकटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन प्रा. डॉ. माहुरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविक व मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या स्थापनेमागचा उद्देश सांगितला. तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदार जनजागृती ती अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. समाजातील सर्वसामान्य माणसांपर्यंत मतदानाच्या हक्काबाबत जागृकता आणली पाहिजे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. चोपडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची कार्यकारिणी जाहीर करून अभ्यास मंडळातील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच राज्यशास्त्र या विषयाचे महत्त्व व शास्त्र म्हणून राज्यशास्त्राची समाजातील भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. कुंडलवाड यांनी केले. तर आभार प्रा.कु. चिकटे यांनी मानले. कार्यक्रमाला राज्यशास्त्राचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. बी. भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश देवतळे व सचिन ढोले यांनी परिश्रम घेतले.