वाडेगाव (डॉ चांद शेख)- गेल्या महिन्याभरा पासून जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे या सततधार पावसामुळे वाडेगावसह परिसरातील मूग उडीदाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोंगुन ठेवलेल्या शेतात पाणी साचल्याने उडीदाला अक्षरशः कोंब फुटल्याने शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतीचा सर्वे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
वाडेगावसह परिसरात गेल्या अनेक दिवसापासून दिवसातून दोन-तीन वेळा तर रात्री मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मुग, उडीद ही शेतकऱ्यांना हातभार लावनारी पिके शेतकऱ्यांच्या घरात येण्याच्या उंबरठ्यावर असतांना मुगाचे पीक चक्क पाण्याखाली आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मुग तोडावाच लागला नाही. तर ज्यांचा मुंग घरी आला तोही चक्क खतासारखा झाला असल्याने त्या मुगांला व्यापारी विचारत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तर उडीदाची हीच परिस्थिती असून सततच्या पावसामुळे सोंगुन ठेवलेल्या शेतामध्ये पावसाचे पाणी साचल्याने उडीदाला जागच्याजागी कोंब फुटले असल्याने उत्पादन तर दूरच लागवडीचा खर्च ही निघने मुश्किल झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. वाडेगावसह परीसरात मुग उडीदाचा पेरा बऱ्यापैकी होता मात्र ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्या मुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असुन आता रब्बी हंगामातील पेरणी कशाच्या भरोश्यावर करावी याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. दरम्यान घरात येण्यालायक झालेली पिके जमीनदोस्त झाल्याने शासनाने मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या पिकाचा सर्वे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.