अकोला (जिमाका)- शाळांच्या सभोवती १०० मिटर परिसरात कोणतेही तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास कायद्याने बंदी असून या कायद्याची कठोर अंमलबजावणी करुन अशाप्रकारे शाळा भवतालच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रेता आढळल्यास कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत बालकल्याण समिती, बालसंरक्षण समिती, सर्वसमावेशक महिला जिल्हा सल्लागार समिती सभा या बैठका आज पार पडल्या. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे अध्यक्षस्थानी होते. या बैठकीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी योगेश आर जवादे, करुणा महान्तारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, बालकल्याण समितीच्या अध्यक्ष पल्लवी कुलकर्णी, माविमच्या वर्षा खोब्रागडे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. रायबोले, वरिष्ठ अधिव्याख्याता सागर तुपे, ॲड. सुनिता कपिले, ॲड. मनिषा धूत, ॲड. अनिता गुरुला, बालरोग तज्ज्ञ डॉ. आरती कुलवळ, सविता सेंगर आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. बालकांच्या हक्कांबाबत जाणीवजागृती होण्यासाठी व्यापक मोहिम हाती घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील विटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी आंगणवाडी, पोषण आहार आदी सुविधा पुरविता यावी यासाठी पावसाळ्यानंतर सुरु होणाऱ्या विटभट्ट्यांवर सर्वेक्षण करण्याची सुचना यावेळी करण्यात आली. शाळकरी मुलांना व्यसनांची सवय लागू नये यासाठी शाळांच्या परिसरात तंबाखुजन्य पदार्थ विक्री संपूर्णपणे थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर बालविवाह प्रतिबंध समिती, बालकल्याण समितीचा आढावा घेण्यात आला. तसेच सर्वसमावेशक महिला सल्लागार समिती सभेत मागील तीन महिन्याच्या कामकाजाचा आढावा घेण्याता आला. करुणा महान्तारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.