हिवरखेड (धीरज बजाज)- येथील अकोट रोड वर जवळच असलेल्या वनराई हॉटेल जवळ दोन मोटारसायकलींची आमोरा समोर धडक होऊन या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचे विश्वसनीय वृत्त समोर आले आहे. हिवरखेड येथील भाऊदेवराव गिर्हे नगर येथे राहत असलेला प्रदीप बाळकृष्ण कट्यारमल हा युवक मोटारसायकलीने कामावरून आपल्या घरी येत होता तर दुसरी कडून शे. शाकीर शे. शराफत व शे. वकील शे. शकील हे मोटारसायकलीने जात होते. त्यात अकोट रोडवरील वनराई हॉटेल समोर दोन्ही मोटारसायकलची आमोरा समोर जोरदार धडक झाली त्यामध्ये प्रदीप कट्यारमल याच्या डोक्याला गंभीर दुखापत आणि प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्याला तात्काळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. घटना स्थळावर सर्वत्र रक्ताचा पाट वाहत असल्याने प्रदीपच्या डोक्याला कीती मोठ्या प्रमाणात मार लागला याची कल्पना येत होती.
प्रदीप ची प्रकृती गंभीर असल्यामुळे हिवरखेड येथून अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात त्या युवकास रवाना करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान मधेच अकोट जवळ त्याचा मृत्यू झाला. हिवरखेड अकोट हा राज्यमहामार्ग प्रचंड खराब झाला असून महामार्गाची न भूतो न भविष्यती अशी दुर्गती झालेली आहे. रस्त्यावर खड्ड्यांची अशी परिस्थिती आहे की रस्ताच नामशेष झाला आहे. हे खड्डे वाचविण्याचा नादात या रस्त्यावर शेकडो अपघात झाले असून या अपघातामध्ये अनेक प्रवाश्यांचा बळी गेला आहे.