अकोला (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच, जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. पक्ष कार्यालयांमध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली असून, मतदार याद्यांचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी शिवसेना व भाजपमधील युतीचे घोडे अद्यापही गंगेत न्हाले नसल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती दिसून येत आहे.
आजच्या घडीला सर्वच पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे लक्ष नेत्यांच्या आदेशाकडे लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, राजकीय मोर्चेबांधणीसाठी विविध पक्षांचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते सरसावले आहेत. आचारसंहिता लागू झाल्यामुळे उमेदवारी अर्ज सादर करण्याची तारीख समजताच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्षांतील स्थानिक नेते, पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला मूर्तिजापूर मतदारसंघ जाणार, हे निश्चित असले तरी आज रोजी बाळापूर आणि अकोला पश्चिमसाठी दोन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. दुसरीकडे भाजप-शिवसेनेची युती होणारच, असा दावा दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून केला जात असला तरी जागा वाटपाच्या मुद्यावरून ऐनवेळी या दोन्ही पक्षांत कधी बिनसणार, याची काहीही शाश्वती नसल्याचे संकेत आहेत. त्यामुळे भाजप-सेनेच्या गोटातून पाचही विधानसभा मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याची तयारी केली जात असल्याचे चित्र तूर्तास समोर आले आहे.
‘वंचित’मुळे बिघडणार राजकीय समीकरणे!
जिल्ह्यात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव आहे. अॅड. आंबेडकर यांनी काँग्रेस-राकाँला टाळी न देता स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणुकीत रंगत येईल, हे निश्चित. यादरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या राजकीय समीकरणांवर मोठा प्रतिकूल परिणाम होईल, असे दिसत आहे