अकोला (जिमाका)- भारत निवडणुक आयोगाने आज आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे, त्यासोबतच तात्काळ प्रभावाने निवडणूक आदर्श आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने निवडणुक पुर्व तयारी केली असुन अकोला जिल्ह्यात निर्भय, निष्पक्ष निवडणूका घेण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक अमोघ गावकर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ, उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, निलेश अपार, अतुल दोड तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित माध्यमप्रतिनिधींना निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अकोला जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघा करीता निवडणुकीचा कार्यक्रम सांगण्यात आला.
कार्यक्रम पुढील प्रमाणे-
१ निवडणुकीची अधिसुचना प्रसिद्ध करण्याचा व नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा दिनांक शुक्रवार दि. 27/09/2019
२ नामनिर्देशनपत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक शुक्रवार दि.04/10/2019
३ नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक शनिवार दि.05/10/2019
४ उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक सोमवार दि.07/10/2019
५ मतदानाचा दिनांक सोमवार दि. 21/10/2019
६ मतमोजणीचा दिनांक गुरुवार दि.24/10/2019
मतदारांची संख्याः- दिनांक 31/08/2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार अकोला जिल्ह्यातील मतदारांचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
विधानसभा निवडणुकीकरीता नियुक्त निवडणुक निर्णय अधिकारी व त्यांचे संपर्क याप्रमाणे-
- रामदास सिद्धभट्टी
उप विभागीय अधिकारी, अकोट
07258-222674
9420499666
2. रमेश पवार
उप विभागीय अधिकारी, बाळापुर
07257-232133
7774928028
3. गजानन सुरंजे
उप जिल्हाधिकारी, महसुल
0724-2426214
8275049620
4. निलेश अपार
उप विभागीय अधिकारी,अकोला
0724-2435336
7588832989
5. अभयसिंह मोहिते
उप विभागीय अधिकारी, मुर्तिजापुर
07256-243472
8453454545
निवडणुक मुक्त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृतीपर (स्वीप) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.कोणत्याही अपप्रचाराला किंवा आमीषाला बळी न पडता स्वतःच्या विवेक बुद्धिने मतदान करावे असे मतदारांना आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
तसेच जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना त्यांचेकडील शस्त्र जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जमा करणे बाबत निर्देश देण्यात आले असुन कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनामार्फत पोलीस बल तैनात ठेवण्यात आले आहे. अवैध दारु भट्टी व अवैध धंदे याबाबत धाडसत्राव्दारे प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक गावकर यांनी दिली. नागरीकांना सुद्धा कोणतीही आक्षेपार्ह बाब निदर्शनास आल्यास त्याकरीता CVIGIL अॅप व्दारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच निवडणुक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर भरारी पथक, व्हीडीओ पाहणी पथक, स्थिर पथक, खर्च निरीक्षण पथक ई. स्थापन करण्यात आलेले आहेत.
निवडणूक आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने निवडणुक आयोगाने निर्गमित केलेल्या सुचनेनुसार शासकीय/निमशासकीय कार्यालय आणि परिसरातुन भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/कट आऊटस/होर्डीग्स/बॅनर्स/झेंडे इत्यादी त्वरीत काढुन टाकणे निर्देश दिले आहेत.त्या प्रमाणे शासकीय/निमशासकीय कार्यालय आणि परिसरातुन भिंतीवरील लेखन, पोस्टर्स/कट आऊटस/होर्डीग्स/बॅनर्स/झेंडे इत्यादी काढण्यात बाबतची कार्यवाही सुरु आहे. तसेच खाजगी मालमत्ते वरील सर्व अनधिकृत राजकीय जाहीरातीसुद्धा आचारसंहिता लागू झाल्यापासुन ७२ तासांचे आत काढुन टाकण्याबाबत संबंधीत प्राधिकरणांना निर्देशित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करण्यात येत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीप उपक्रमाबाबत माहिती दिली व मतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले. तसेच अनधिकृत मद्यविक्री व अनुज्ञप्ती धारक मद्य विक्रेत्यांवरील नियंत्रण याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिक्षक स्नेहा सराफ यांनी माहिती दिली.