अकोला (प्रतिनिधी) : लष्करी अळीने मका पिकावर हल्ला केला असून, आतापर्यंत ३५ टक्क्यांच्या जवळपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अळीची ज्वारी, बाजरी तृणवर्गीय पिकावर प्रादुर्भावाची शक्यता आहे. कापूस पिकावर अद्याप तरी नोंद नाही; परंतु शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
लष्करी अळी (फॉलआर्मीवर्म) ही मूळची संयुक्त राज्य ते अर्जेंटिनापासून पसरलेल्या दक्षिण गोलार्धातील उष्ण कटिबंधीय प्रदेशातील आहे. उन्हाळ्यात या अळीचे पतंग ३६०० किलोमीटरचे अंतर ३० तासात कापून स्थलांतर करतात. त्यामुळे यांचा प्रसार झपाट्याने होेतो. गतवर्षीच्या जून-जुलै महिन्यात तामिळनाडू व कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत या अळीची प्रथमच नोंद झाली. आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातून प्रवास करीत ही अळी महाराष्ट्रात पोहोचली. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील तांदूळवाडी येथे सप्टेंबर महिन्यात या अळीची प्रथम नोंद घेण्यात आली. सांगली, सातारा, पुणे, नांदेड, हिंगोली तसेच बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात असलेल्या माळेगाव (गोंड) येथील मका पिकावर मोठ्या प्रमाणात ही अळी आढळून आली. या अळीने माळेगावातील आठ एकर मका उद्ध्वस्त करू न टाकला होता.
आता महाराष्टÑाच्या इतरही भागात प्रसार होत असून, बहुभक्षीय असलेली ही अळी ८० पेक्षा जास्त वनस्पतींवर आपली उपजीविका करते. गवतवर्गीय पीक हे या अळीचे सर्वात आवडते खाद्य आहे. ही अळी पिकावर सैन्यासारखी चाल करू न समोर येणारी सर्व वनस्पती फस्त करते. सध्या राज्यातील मका, ज्वारी, बाजरी पिकांवर तिने बस्तान मांडले आहे. मका पिकाचे तर सरासरी ३५ ते ४० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कपाशीवरसुद्धा ही अळी येण्याची शक्यता असल्याने शेतकºयांनी कापूस पिकाचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे.
मका पिकावर ही अळी आली आहे. विदर्भात सुरुवातीला नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. कापूस पिकावर अद्याप तरी या अळीची कोणतीही नोंद आढळली नाही.
– डॉ. अनिल कोल्हे,
मुख्य पीक संरक्षण अधिकारी,
कीटकशास्त्र विभाग,
डॉ. पंदेकृवि, अकोला.