औरंगाबाद – कडाक्याचे भांडण झाल्यामुळे संतापलेल्या पत्नीने उद्योजक शैलेंद्र शिवसिंग राजपूत (४०) यांच्या जांघेत चाकू खुपसून त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उल्कानगरीत घडली. गेल्या अनेक वर्षांपासून दोघांमध्ये वाद होता. सोमवारी पती शैलेंद्र रात्री ११.३० च्या सुमारास घरी परतल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा खटके उडाले आणि रागाच्या भरात स्वयंपाकघरात जाऊन पत्नीने चाकू आणला आणि आपल्या सहा वर्षांच्या मुलीसमोरच पतीची निर्घृणपणे हत्या केली. या भयंकर घटनेेमुळे उल्कानगरीच्या उच्चभ्रू वसाहतीमध्ये खळबळ उडाली.
उल्कानगरीतील अत्यंत पॉश अशा खिंवसरा पार्कमध्ये फ्लॅट क्रमांक ७०२ मध्ये राजपूत कुटुंब राहते. शैलेंद्र आणि पूजा यांना दोन मुली असून थोरली सोळा तर धाकटी सहा वर्षांची आहे. आईने डोळ्यादेखत बाबांचा खून केल्याचे पाहून दोन्ही मुली प्रचंड भेदरल्या होत्या. इकडे राग शांत झाल्यानंतर पत्नी पूजा हिने थंड डोक्याने आपल्या मैत्रिणीला फोन करून ही घटना सांगितली. या मैत्रिणीचा पती आणि पूजाचा दीर हे मित्र आहेत. त्या मित्राने शैलेंद्रचा भाऊ सुरेंद्र यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर जवाहरनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पूजाला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतरही पूजा काहीच बोलत नव्हती. खोदून खोदून विचारले असता ती एवढेच म्हणाली, तुम्ही शैलेंद्रलाच विचारा. पूजाचे हे उत्तर ऐकून पोलिसही चक्रावले.
काय घडले सोमवारी रात्री
उद्योजक शैलेंद्र यांचा मोठा भाऊ सुरेंद्र, भारत यांची हिरा पॉली प्रिंट प्रा. लि. ही कंपनी आहे. तिघेही भाऊ एकत्र राहत होते. मात्र पूजामुळे शैलेंद्रने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी शैलेंद्र सेव्हन हिल्स परिसरातील एका हॉटेलमध्ये मित्रांसोबत जेवणासाठी गेले हाेते. रात्री बारा वाजेच्या सुमारास ते घरी गेले. इमारतीच्या खाली ते बराच वेळ फोनवर बोलत होते. त्यानंतर शैलेंद्र घरी गेले. फोनवर बोलत असल्याने पत्नी पूजा हिने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. शैलेंद्र यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु पूजाने वाद सुरूच ठेवला. एक वाजेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. रागाच्या भरात शैलेंद्र यांनी पूजा यांच्या तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर दोघांमध्ये झटापट सुरू झाली. दोघांच्या भांडणामुळे व आरडाओरडीमुळे शेजारील बेडरूममध्ये झोपलेली त्यांची सहा वर्षांची मुलगी जागी झाली. आई-वडिलांचे भांडण वाढत असल्याने तिने मोठ्या बहिणीला झोपेतून उठवले. परंतु तेवढ्यात पूजाने स्वयंपाकघरात जाऊन चाकू घेऊन बेडरूममध्ये असलेल्या शैलेंद्र यांच्या जांघेमध्ये खुपसला.
रक्तबंबाळ शैलेंद्रची बेडरूमबाहेर धाव
रक्तबंबाळ शैलेंद्र यांनी जीव वाचवण्यासाठी बेडरूमच्या बाहेर धाव घेतली. परंतु हॉलमध्येच ते खाली कोसळले. शैलेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याची माहिती त्यांचे भाऊ भरत व नंतर सुरेंद्र यांना कळली. त्यांनी तत्काळ त्यांच्या घरी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी जवाहरनगर पोलिसांना घटनेची माहिती कळवली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र जाधव, उपनिरीक्षक शशिकांत तायडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पती रक्ताच्या थारोळ्यात, ती पुरावे नष्ट करण्यात गुंग
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वडिलांना पाहून दोन्ही मुली घाबरल्या. त्यानंतर पूजा यांनी शांतपणे बाथरूममध्ये जाऊन बादलीत पाणी आणले. बेडरूम व स्वयंपाकघरात पडलेले रक्त पुसले. नंतर दोन बादल्या पाणी भरून खोलीतील रक्त धुऊन काढले. त्यानंतर रक्ताने भरलेल्या पाण्याच्या बादलीतच टर्किश टॉवेलमध्ये चाकू गुंडाळून बादलीत ठेवून दिला. चौकशीवेळी पूजाने बादलीतील चाकू काढून दिला.
पूजाचे उत्तर ऐकून पोलिसही अवाक्; माहेरच्या मंडळींशी चर्चा
मध्यरात्री घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना काही वेळानंतर पूजाने खुनाची कबुली दिली. मात्र मंगळवारी ती चौकशीला प्रतिसाद देत नव्हती. पोलिसांनी भांडणाचे कारण विचारले, खून का केला, तेही विचारले. परंतु मला काहीच माहिती नाही, शैलेंद्र यांनाच विचारा, असे तिचे उत्तर ऐकून पोलिसही अवाक् झाले. पोलिसांनी पूजाच्या माहेरच्या मंडळींशी चर्चा केली असता पूजा पहिल्यापासूनच तापट स्वभावाची आहे, त्यातून त्यांच्यात वाद झाला असावा, परंतु ती खून करू शकत नाही, असे ते वारंवार सांगत होते.
बारा तासांनी म्हणाली, मला शेवटचा चेहरा पाहू द्या
मंगळवारी सकाळी पूजाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सकाळी साडेसात वाजता पूजाचे कुटुंब शहरात दाखल झाले होते. सकाळपासून ते ठाण्यात ठाण मांडून होते. दुपारी तीन वाजता तिला तपासणी पूर्ण करून ठाण्यात नेण्यात आले. आजी, आईला पाहून पूजा यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. खून केल्यानंतर १२ तास शांत असलेल्या पूजाने दुपारी अचानक मला शैलेंद्र यांना शेवटचे एकदा पाहू द्या, अशी विनंती सुरू केली. पोलिसांनी मात्र ती साफ फेटाळून लावली.
चार वर्षांपूर्वी छळाची तक्रार
शैलेंद्र व पूजा यांचा २००२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. परंतु लग्नाच्या काही वर्षांनंतरच त्यांच्यात सतत वाद होत होते. चार वर्षांपूर्वी त्यांनी शैलेंद्रविरोधात छळाची तक्रारदेखील दिली होती. काही महिन्यांपूर्वीच पूजाने पतीच्या अंगावर उकळते पाणी टाकले होते. ती मध्यंतरी माहेरी निघून गेली होती. तिचे वडीलही उद्योजक आहेत.
एका कॉलवरून सुरू झाला वाद
घरात जाताच पूजाने शैलेंद्रसोबत वाद घालण्यास सुरुवात केली होती. कोणाशी बोलत आहात, कोणाचा काॅल आहे, असे प्रश्न विचारल्याने वाद वाढत गेला. या वेळी शैलेंद्र आणि पूजा यांच्यात झटापट झाली. परंतु खून केल्यानंतर पूजाने पहिला कॉल तिच्या मैत्रिणीला केला. त्या मैत्रिणीचा पती पूजाचे दीर सुरेंद्र यांच्या ओळखीचा असल्याने त्याने तत्काळ त्यांना कॉल करून घटनेची माहिती दिली.