मुंबई – विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांत लागेल त्यामुळे सर्व पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीपासून आमचं ठरलंय असं म्हणणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचं घोडं जागावाटपात अडलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून युतीच्या चर्चेला मात्र ब्रेक लागला आहे.
अशातच विधानसभा निवडणुकीत 144 जागा मिळाल्या तर युती अन्यथा युती तुटण्याची शक्यता आहे असं विधान शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे. तर युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीत जागावाटपाचा जो फॉर्म्युला ठरला आहे त्यात शिवसेना विश्वासघात करणार नाही असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपा युतीत काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून युतीबाबत बोलणी थांबविण्यात आल्याची माहिती आहे. शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर ठाम राहिल्याने युतीची चर्चा पुढे सरकली नाही. शिवसेनेला जास्तीत जास्त 120 जागा सोडण्याचा भाजपाचा इरादा आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे मी पुन्हा येणार यातून पुढील मुख्यमंत्री भाजपाचाच असणार हे संकेत दिले आहेत. त्यामुळे जागावाटपाबाबत शिवसेना-भाजपाचं ठरलंय असं म्हणणारे नेते आता युतीबाबत वरिष्ठ निर्णय घेतील असं सांगून उत्तर देणं टाळत आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येणारं सरकार आपलंच असेल अन् पुढचा.. तुम्ही समजून जा असं विधान करुन मुख्यमंत्री पदावरचा दावा शिवसेनेने सोडला नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आरेमधील कारशेडवरुनही शिवसेना-भाजपात वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आरेतील कारशेडला शिवसेनेने विरोध केला आहे. नाणारचं जे झालं ते आरेचं होईल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली मात्र मुख्यमंत्र्यांनी नाणारमध्ये पुन्हा रिफायनरीबाबत चर्चा होऊ शकते असं विधान करुन अप्रत्यक्षरित्या शिवसेनेला टोला लगावला आहे.
दिवाकर रावते यांच्या विधानावरुन भाजपा मंत्री गिरीश महाजन यांनी ज्यांना युतीबाबत बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी बोलू नये असं सांगत दिवाकर रावतेंवर टीका केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच युतीबाबत निश्चित सांगू शकतात. पण शिवसेना-भाजपा युती 100 टक्के होणारच असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.