अकोला(प्रतिनिधी)- पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शहर वाहतूक शाखेचा कार्यभार घेताच, अकोल्याच्या बिघडलेल्या वाहतुकीस शिस्त लागावी म्हणून उपाय योजना सुरू केल्या असून, महत्वाच्या व वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कर्मचारी वाढविण्यात आले असून, सदर कर्मचारी हे ड्युटी चे ठिकाणी हजर राहतात की नाही हे पोलीस निरीक्षक गजानन शेळके स्वतः चेक करतांना दिसतात, त्याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक अमोघ गावकर ह्यांचे आदेशाने व पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली आज अकोला शहरातील इन्कम टॅक्स चौक, हुतात्मा चौक, जठरपेठ चौक, सिविल लाईन चौक हया ठिकाणी ट्रिपल सीट, धावत्या वाहनावर मोबाईल वर बोलणारे, नो पार्किंग मध्ये वाहन उभे करणारे, ऑटो मध्ये पुढील बाजूस प्रवासी बसविणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक नियमांची जरब बसविण्या साठी विशेष मोहीम राबविण्यात आली, ह्या अंतर्गत एकूण 120 वाहन चालकांवर कारवाई करून 26000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अकोला शहरात दोन्ही प्रमुख रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते, चुकीच्या जागी वाहन पार्किंग केल्याने ह्यात आणखी भर पडते, त्या मुळे नागरिकांनी वाहन पार्किंग करतांना वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही ह्याची दक्षता घेण्याचे आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात येत आहे, चुकीचे पार्किंग करणाऱ्याला दंडामक कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशारा पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी दिला असून, अशी मोहीम सतत सुरूच राहणार असल्याचे सांगितले