मुंबई : भारतीय क्रिकेट वर्तुळात गेल्या दोन दिवसांपासून मॅच फिक्सिंगचे वादळ घोंगावू लागले आहे. सुरुवातीला तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याची बाब समोर आली होती. आता या मॅच फिक्सिंगचे हे लोण महिला क्रिकेटमध्येही पसरले आहे. भारतीय संघातील दोन महिला क्रिकेटपटूंनी त्याच्याशी बुकींनी संपर्क साधल्याची तक्रार केली आहे. यावर बीसीसीआय भ्रष्टाचार विरोधी विभागचे प्रमुख अजित सिंह शेखावत यांना या मॅच फिक्सिंगच्या वाढत्या घटनांबाबत विचारणा करण्यात आली त्यावेळी त्यांनी हे रोखण्यासाठी मॅच फिक्सिंगसाठी स्वतंत्र कायदा करणे गरजेचे आहे. तसेच सट्टा बाजार कायदेशीर करण्यावर विचार करावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
शेखावत यांना क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवणे अशक्य झाले आहे का असे विचारले असता त्यांनी मॅच फिक्सिंग विरोधात आपल्याला स्वतंत्र कायद्याची गरज आहे. जर स्वतंत्र कायदा असेल तर पोलिसांनाही काम करण्यात स्पष्टता येईल असे सांगितले. गेल्या वर्षी भारतीय कायदा आयोगाने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियासारखे मॅच फिक्सिंग हा फौजदारी गुन्हा करण्याची गरज असल्याचे म्हटले होते.
यानंतर शेखावत यांनी क्रीडा क्षेत्रातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी सट्टा बाजार कायदेशीर करण्याचाही पर्यायाचा विचार केला पाहिजे यामुळे सट्टा एका कक्षेत येईल त्यामुळे तो नियंत्रित करण्यास सोईचे होईल असेही ते म्हणाले. तसेच यातून सरकारला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळेल. सट्ट्यात मोठ्या प्रमाणात पैशाची उलाढाल होत असते त्यामुळे महसूल विभागाला आता मिळत असलेल्या महसूलाएवढा महसूल यातून मिळेल.
सट्टा कायदेशीर केल्याने फक्त महसूल मिळणार नाही तर सट्टा कायदेशीर केल्याने तो नियंत्रितही करता येईल. तो एकदा कायदेशीर झाल्यानंतर त्यासंदर्भातील माहितीही उपलब्ध होईल, आता सट्ट्यातील व्यक्ती थोडा दंड भरुन मोकाट सुटतात. असे मत त्यांनी व्यक्त केले. याचबरोबर त्यांनी सट्टा कायदेशीर कराच असे नाही पण त्याच्यावर विचार व्हायला हवा असेही सुचवले.