पातूर (सुनील गाडगे)- तालुक्यातील सस्ती येथील अल्पभूधारक शेतकरी स्वर्गीय महादेव परकाळे वय 45 यांनी 26 मे रोजी आपल्या राहत्या घरी विष प्राशन करून तर स्वर्गीय संतोष बोरकर वय 42 यांनी 5 मार्च रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतीसाठी लागणारा खर्च व त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न यामुळे आलेला कर्जबाजारीपणा व सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे या दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. त्यानिमित्ताने शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या व नटसम्राट नाना पाटेकर व आदर्श अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या “नाम फाउंडेशन” या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदत म्हणून 15 हजार रुपयांचा धनादेश प्रत्येकी त्यांच्या विधवा पत्नी श्रीमती आशा महादेव परकाळे व श्रीमती शीला संतोष बोरकर यांना देण्यात आला. ही मदत नाम फाउंडेशन चे विदर्भ व खानदेश चे समन्वयक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात व नाम फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक माणिक शेळके यांच्या हस्ते देण्यात आली.
आतापर्यंत नाम फाउंडेशनने विदर्भ व मराठवाडा या भागात आठ गावे दत्तक घेतली असून अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंधारण, तलाव खोलीकरण, नद्यांमधील गाळ उपसणे अशी अनेक समाजोपयोगी कामे लोकसहभागातून केली आहे. तर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा महिलांना सानुग्रह मदत म्हणून 15 हजार रुपये नाम फाउंडेशन च्या वतीने देण्यात येते अथवा या कुटुंबातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना शिलाई मशीन, शेळ्या व इतर रोजगाराचे साहित्य मदत म्हणून देण्यात येते. आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील 35 शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असून 22 कुटुंबांना पंधरा हजार रुपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले आहेत. ही मदत देतावेळी नामचे पातुर तालुका समन्वयक मंगेश गोळे, गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉ राजेंद्र बदरखे, दिलीप परनाटे, मुरलीधर बदरखे, सहदेवराव बदरखे, प्रविण शेळके, बाळकृष्ण दांदळे, सुधाकर कराळे, संदीप हागे, शुभम वाघ, मंगेश ताले, गणेश परकाळे, गोपाल बदरखे, रामकृष्ण काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.