भंडारा (प्रतिनिधी)- महाराष्ट्रभर झालेल्या गणेश उत्सवा दरम्यान डोळ्यात तेल ओतून रोखचोख पोलीस बंदोबस्त बजावणाऱ्या पोलिसांप्रती सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन या संघटनेने पोलिसांना अल्पोहार दिला. रात्रंदिवस जनतेचे रक्षक म्हणून कार्य करणाऱ्या पोलिसांना आपले घर, दार सण, आणि उत्सव सोडून कर्तव्य पार पाडावे लागते. पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठा आणि परिश्रम लक्षात घेता महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन नेहमी असे स्तुत्य उपक्रम राबवित असते. गेल्या वर्षी अकोला जिल्ह्यातील अतिसंवेदनशील असलेल्या अकोट तालुक्यात गणपती विसर्जनाच्या दिवशी कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना जेवण आणि थंड पाण्याचे वाटप अकोला जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आले होते. त्याच उपक्रमाची पुनरावृत्ती आज भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात पाहायला मिळाली. नव्यानेच नियुक्त केलेले आणि सामाजिक कार्यात सदा अग्रेसर नवनिर्वाचित भंडारा जिल्हाध्यक्ष प्रदिप घाडगे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पवनी शहरात जेवढे पोलीस बांधव तैनात करण्यात आले होते. त्या सर्वांना त्यांच्या ठिकाणावर जाऊन अल्पोहार आणि थंड पाण्याचे वाटप करण्यात आले.