अकोला (प्रतिनिधी)- वंचित बहुजन आघाडीला आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने गॅस सिलिंडर हे चिन्ह प्रदान केले आहे. लोकसभा निवडणुकीत बहुतांश ठिकाणी कप-बशी या चिन्हावर वंचितचे उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी ही कप-बशी भाजपाच्या पथ्यावर पडत काँग्रेसच्या घरात फुटली होती. त्यामुळे यावेळी वंचितच्या सिलिंडरमुळे कोणता पक्ष ‘गॅस’वर राहतो, याकडे लक्ष लागले आहे.
वंचित बहुजन आघाडी राज्यातील २८८ जागांवर निवडणूक लढविण्यास सज्ज झाली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या नेतृत्वात पार्लमेंटरी बोर्ड विभागनिहाय दौरे करून संभाव्य उमेदवारांची चाचपणी करीत आहे. दुसरीकडे काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही; मात्र येत्या पंधरा दिवसांत वंचितच्या उमेदवारांची पहिली यादी अपेक्षित आहे. वंचितच्या उमेदवारांमुळे प्रत्येक मतदारसंघात तिरंगी लढत होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. या लढतीत वंचितचा उमेदवार कोण, यावरही मतदारसंघाचे समीकरण ठरणार असल्याने वंचितच्या उमेदवारीमुळे कोण ‘गॅस’वर जातो, हे काळच ठरवेल. दरम्यान, पक्षाने निवडणूक आयोगाकडे कप-बशी, किल्ली व शिटटी असे चिन्ह मागितले होते. त्यापैकी गॅस सिलिंडर हे चिन्ह प्रदान करण्यात आल्याची माहिती प्रवक्ते राजेंद्र पातोंडे यांनी दिली.