अकोला (प्रतीनिधी ): शासनाकडून पीककर्ज माफ झालेले असतानाही पीककर्ज माफ करुन देण्याच्या नावाखाली गावंडगाव येथील शेतकऱ्याची १ लाख २० हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या मळसूर येथील गट सचिवाने याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती, परंतु जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश भालेराव यांनी त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने आता त्याला पोलिसांना शरण किंवा उच्च न्यायालया अर्ज केल्या शिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. गुन्हा दाखल झाल्यावर त्याला अटक न करणाऱ्या चान्नी पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे आरोपींचे चांगलेच फावले होते, परंतु न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळल्याने चान्नी पोलिसही तोंडघशी पडले असून, आता त्याला अटक करण्याखेरीज त्यांच्यासमोरही दुसरा पर्याय उरलेला नाही. वास्तविक, चान्नी पोलिसांनी या आरोपींना गुन्हा दाखल करुन वेळीच बेड्या ठोकल्या असत्या तर त्यांना कोर्टात जामिनासाठी धाव घेण्याची संधीच मिळाली नसती. यामुळे चान्नी पोलिसांची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. दरम्यान, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे सूतोवाच करणारे नवे जिल्हा पोलिस अधीक्षक अमोघ गावकर या गंभीर प्रकरणात लक्ष घालतील काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
गावंडगाव येथील शेतकरी केशव भालचंद्र राठोड ( वय ६०) यांचे पीककर्ज शासनाने अगोदरच माफ केलेले असतानाही गट सचिव अजित विश्वंभर काळे याने एका खासगी व्यक्तीच्या मदतीने केशव राठोड यांची दिशाभूल केली. तुमचे पीककर्ज माफ झालेले नाही, त्याचे पुनर्गठण करुन देतो, असे सांगून अजित काळे याने केशव राठोड यांच्याकडे एटीएम कार्डची मागणी केली. त्यांच्यावर विश्वास ठेवून केशव राठोड यांनी आलेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आपले एटीएम कार्ड आणि त्याचा पासवर्ड दिला राठोड यांच्या अज्ञानाचा फायदा घेत अजित काळे याने संगनमताने त्यांची फसवणूक करीत राठोड यांच्या खात्यातील तब्बल १ लाख २० हजार रुपये दुसऱ्याच्या खात्यात वळते केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राठोड यांनी चान्नी पोलिसांत धाव घेऊन अजित काळे याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली. चांनी पोलिसांनी त्या तक्रारीवरुन आरोपींच्या विरोधात कलम ४२० ४०६ ४०९ ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे; मात्र आरोपींना अटक केली नाही. त्यामुळे आरोपी अजित काळे याने अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी कोर्टात धाव घेतली हाती मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे त्यामुळे आता आरोपी अजित काळे समोर दोन पर्याय उरले आहे एक तर पोलिसांना शरण जाणे नाहीतर उच्च न्यायालयात दाद मागणे दरम्यान या प्रकरणी उच्चन्यायालयात दाद मागणार असल्याचे आरोपी गट सचिव अजित काळे याचे वकील ऍड प्रकाश वखरे यांनी सांगितले