* समर्थकानी केले वृक्षारोपण आणि फळवाटप
हिवरखेड (धीरज बजाज)-राजकीय परंपरा पाहता कोण्या मोठ्या लोकप्रतिनिधीचा वाढदिवस असला तर संबंधित लोकप्रतिनिधीचे समर्थक पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक जनता त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्याची प्रथा चालत आलेली आहे. परंतु अकोट विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांसह विरोधकांनी सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार समर्थकांनी महात्मा गांधी अस्थिस्मारक सदाशिव संस्थान येथे वृक्षारोपण आणि रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम राबविला. यावेळी भाजपाचे दिलीप नाठे, रमेश दूतोंडे, अनिल कराळे, बजंरग तिडके, रवीभाऊ दवे, किरण सेदानी, रवी मानकर, मोनू राठी, विरेंद्र येऊल, अशोक कराळे, केशव कोरडे, बाळासाहेब नेरकर, गोवर्धन गांवडे इत्यादी उपस्थित होते.
मात्र दुसरीकडे भारिप बहुजन महासंघ तर्फे आकोट हिवरखेड सह अनेक रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून आमदारांच्या वाढदिवशी हिवरखेड- अकोट रोडवरील खड्ड्यांचे बेशरमच्या फुलांनी पूजन करून बेशरम चे रोपटे लावले तसेच या रस्त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अनेक जणांच्या आत्म्यांना शांती मिळण्याकरिता श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. त्यामध्ये मौन पाळून मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या निषेध कार्यक्रमाला भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुका अध्यक्ष संदीप इंगळे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, माजी तालुका अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, माजी उपसभापती मधुकरराव पोके, तालुका उपाध्यक्ष हिफाजत खा सर्कल अध्यक्ष रवींद्र वाकोडे, प्रदीप पाटील, अजीज खा जमीर खा, नरेश बांगर, शांताराम कवळकार, जाकीर खा, सुखदेव भगत, मनोज भगत, सै मोहसीन, मनोहर ताडे, सुशील इंगळे, लड्डुभाई, युसुफ खा यांच्या सह असंख्य नागरिक उपस्थित होते.
अकोट मतदार संघाच्या अनेक रस्त्यांची अनेक वर्षांपासून प्रचंड प्रमाणात दुरावस्था झालेली असून अनेक लोकप्रतिनिधी या समस्यांवर सपशेल अपयशी ठरलेले होते हे विशेष. परंतु मागील निवडणुकीत दर्यापूर मतदारसंघाचा कायापालट आम्ही केलेला आहे आणि आता अकोट मतदारसंघाचा कायापालट करू असे आश्वासन देऊन निवडून आलेल्या आमदार भारसाकळे यांची आश्वासने पोकळ ठरल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी 51 कोटींची मंजुरात असलेले रस्त्याचे काम संथगतीने आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे प्रमुख रस्त्याच्या दर्जेदार दुरुस्तीच्या मागणीसाठी शांततामय मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून हिवरखेड येथून रस्ता ग्रस्त संघर्ष समितीने आवाज उठविला होता. त्यांना प्रशासनामार्फत लिखित आश्वासन मिळाल्यानंतर ही अनेक आश्वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. उलट राजकीय दबावापोटी पोलिसांनी रस्ता ग्रस्त संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना नोटिसेस बजावल्या होत्या. अशी चर्चा सुद्धा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरू आहे.आमदारांच्या वाढदिवशी सकारात्मक आणि नकारात्मक रीत्या साजरा झालेल्या कार्यक्रमांमुळे मतदारसंघातील रस्त्यांचा मुद्दा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे एवढे मात्र निश्चित…