हिवरखेड (दीपक रेळे) : MBBS डॉक्टरांची कमतरता, अतिरिक्त 108 रुग्णवाहिकेचा अभाव, आणि थर्ड क्लास रस्ते ठरताहेत अनेक रुग्णांच्या मृत्यूचे कारण
हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नसल्याने काही दिवसातच तिसरा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे.
सविस्तर असे की हिवरखेड मधील स्व. भाऊदेवराव गिर्हे नगर येथे वास्तव्यास असलेले ज्ञानदेव सखाराम इंगळे वय 65 हे आजारी पडल्याने दिनांक 19 जुलै शुक्रवार रोजी दुपारी त्यांना कुटुंबीयांनी हिवरखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. परंतु तेथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, हजर नसल्यामुळे व त्यांना अर्धांग वायूचा त्रास असल्याचे जाणवल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनी प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोला येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कुटुंबीयांनी अनेकदा रुग्णवाहिकेसाठी 108 वर कॉल केले. परंतु दीड दोन तास उलटूनही 108 रुग्णवाहिका पोहोचलीच नाही असा कुटुंबीयांचा आरोप आहे. 108 रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्यामुळे शेवटी सामाजिक कार्यकर्ते सुनील इंगळे यांनी 102 रुग्णवाहिका बोलावली. परंतु ज्ञानदेव इंगळे यांची प्रकृती गंभीर झाल्याने आणि हिवरखेड अकोट राज्यमार्ग अत्यंत खराब असल्याने पुढील उपचारार्थ पोहोचण्याआधीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या हिवरखेड या मोठ्या गावातच रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेक मृत्यू ओढवत आहेत. त्यामुळे इतर ठिकाणचा विचार न केलेलाच बरा अशी परिस्थिती आहे.
काही दिवसाआधीच वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे सौ शीला वाकोडे या महिला एसटी वाहकाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य सभापती, जिल्हा आरोग्य अधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार इत्यादी अनेक मोठ्या अधिकारी पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करून योग्य दिशा निर्देश दिले होते परंतु येथील परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. नंतर सरकारी दवाखान्याच्या शेजारीच राहणाऱ्या यशोदाबाई पटवे ह्यांना सर्पदंश झाल्याने त्यांनाही डॉक्टर नसल्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि खराब रस्त्यांमुळे रस्त्यात उशीर झाल्यामुळे त्यांचाही मृत्यू झाला होता.
कोलमडलेली आरोग्य सेवा आणि प्रमुख रस्त्यांची झालेली प्रचंड दुरावस्था हेच नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.
अन्य एका घटनेत सौंदळा येथील प्रतिष्ठित नागरिक व भाजपा युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ संजय शर्मा यांचे मोठे वडील डॉ नारायणजी शर्मा यांना हृदयविकाराचा त्रास झाल्याने अकोट येथे नेत असताना त्यांचाही वारखेड हिवरखेड अकोट ह्या राज्यमार्गाच्या दूरावस्थेमुळे पोहोचण्यास उशीर झाल्याने रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला.
काही दिवसाधीच ज्ञानदेव भड यांना हिवरखेड येथून अकोला उपचारार्थ नेताना त्यांचाही रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला होता.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा ढेपाळलेला कारभार, MBBS डॉक्टरांची कमतरता, अतिरिक्त 108 रुग्णवाहिकेचा अभाव आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे वर्षानुवर्षापासून रस्त्यांची होत असलेली दुर्गती म्हणजेच थर्ड क्लास रस्ते या बाबी अनेक रुग्णांच्या मृत्यू संख्या वाढण्यास प्रामुख्याने कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये दिव्यांग धिरजची नोंद, आता माऊंट एल्बुज मोहिमेवर जाणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola