मुंबई : राज्य सरकारच्या शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेत आत्तापर्यंत शेतकऱ्यांची २४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. दीड लाखापर्यंत ही कर्जमाफी असून राज्यातील ८५ टक्के शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखाच्या आत आहे. काही कारणामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्या बाहेर राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा फायदा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सुरुवातीला मी ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी द्यावी लागेल, असे सांगितले होते. पण ही माहिती बँकांनी दिलेल्या माहितीवर आधारित होती. आता बँकांनी ११ लाखांहून अधिक खाती कमी केली. अजून ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी राहिली आहे, त्यासाठी आणखी सात हजार कोटी रुपये लागतील. ही कर्जमाफी दिली जाईल.’
जलयुक्त शिवार योजनेवर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. ही योजना मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे राबविल्याने दुष्काळाची झळ कमी करू शकलो. २०१२ मध्ये ९१ टक्के पाऊस झाला असताना १२८ लाख मे. टन उत्पादन झाले होते. यंदा ७० टक्के पाऊस झाला असतानाही ११५ लाख मे. टन उत्पादन झाले. जवळपास २१ टक्के पाऊस घटूनही तुलनेने उत्पादकता वाढली, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
सन २०१३ मध्ये १०९ टक्के पाऊस झाला. त्यावेळी १३६ लाख मेट्रिक टन, तर २०१६ मध्ये ९५ टक्के पाऊस पडला तेव्हा १४५ लाख मे. टन उत्पादन झाले. सोयाबीनची १६ टक्के आणि कापसाची १७ टक्के उत्पादकता वाढली. कापूस ६० वरून ७१ लाख मेट्रिक टनावर, तर सोयाबीन ४० वरून ४७ लाख मे. टनावर गेले. पावसावरचे अवलंबित्व कमी करून संरक्षित सिंचनाची व्यवस्था उभी केल्याने हे शक्य झाले असल्याचा दावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. जलयुक्त शिवार योजना समजून घेतली तर यात छोटी-छोटी कामे आहेत, त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव नाही. तसेच जिथे कमी दर्जाची कामे आढळली त्याठिकाणी कारवाई केली, असे ते म्हणाले.
पीक विमा तक्रार निपटारा करण्यासाठी त्या प्रमाणात विमा कंपन्यांची व्यवस्था नसते. हे लक्षात घेऊन याबाबत अटी-शर्ती बदलण्याचा प्रयत्न करतो आहोत. यामध्ये पाच सरकारी कंपन्या आहेत. खासगी कंपनीला परवाना यापूर्वीच्या केंद्र सरकारने दिला आहे. यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शेततळे योजनेचा नरेगाशी समन्वय
‘मागेल त्याला शेततळे योजनेचा नरेगाशी समन्वय करण्यात आला आहे. आत्तापर्यंत एक लाख ६१ हजार शेततळी पूर्ण केली. तसेच दोन लाख ३० हजार ६३५ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. मागणीनुसार आपण आणखी देत आहोत. योजनेसाठी नरेगातून ४५ हजार आणि सरकारचे ५० हजार असे एकूण ९५ हजार रुपये शेततळ्यांसाठी दिले जातात. यापलिकडे जाऊन जिथे शक्य आहे तिथे गावतळ्याला मान्यता देण्याचा विचार आहे’, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बालभारतीचा निर्णय शास्त्रशुद्ध पद्धतीने
बालभारतीने पाठ्यपुस्तकात सुलभता येण्यासाठी नवीन पद्धत आणली आहे. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एससीआरटी हे स्वायत्त मंडळ आहे. त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने हा निर्णय घेतला आहे. शिकण्याची क्षमता विकसित करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतला. गैरसमज जनतेमध्ये पसरवला जातोय. तरीही समिती नेमून याबाबत तपासणी करून उचित निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री म्हणाले…
– ‘हर घर को नल और हर नल को जल’ असा प्रयत्न महाराष्ट्रात करत आहोत.
– कांदा अनुदानापोटी ११४ कोटी रुपये वितरित केले आहेत. पुरवणी मागण्यांमधून मंजूर झाल्यावर ३८७ कोटी रुपये वितरित करणार आहोत.
– पोलिसांसाठी ३७,८१९ घराचे बांधकाम सुरू आहे. एकूण एक लाख घरांचे नियोजन आहे.
– सेस इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात, समितीने दिलेल्या मताचा विचार करून नियमांमध्ये बदल करू. १५ दिवसांत निर्णय घेऊ.
– संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २७ ते २८ हजार अतिक्रमणांचे एसआरएच्या माध्यमातून ४७ एकर आणि म्हाडाच्या माध्यमातून ४३ एकर जागेवर पुनर्वसन मार्गी लावणार.
– छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबत सर्व परवानग्या देऊन कार्यादेश दिले आहेत. समुद्रात ७० ते ८० कोटींचे प्राथमिक काम केले आहे.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सन २०२० मध्ये महापरिनिर्वाण दिनी येणाऱ्यांना दिसले पाहिजे, असा प्रयत्न आहे.
– मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर सन २०२० पर्यंत पूर्ण करू.
– धारावी पुनर्वसन प्रकल्पातील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी रेल्वेची जवळची ४५ एकर जागा केंद्राकडून विकत घेतली असून आता काम सुरू होते आहे.
– ‘महापरीक्षा’ संस्थेमध्येच होईल. सायबर कॅफेमध्ये होणार नाही. खासगी जागेत होणार नाही. ४,९०० नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत.
– मेगाभरतीचे काम सुरू आहे. राज्यातील रिक्त दीड लाख पदे दोन वर्षांमध्ये भरणार आहो.
अधिक वाचा : चार वर्षांमध्ये 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola